Devdutt Padikkal Second Century Against Sri Lanka : भारत-श्रीलंका दुसऱ्या कसोटीत देवदत्त पडिक्कलने सलग दुसरं शतक ठोकलं. पहिल्या कसोटीत १६७ धावा केल्यानंतर पुन्हा शतकी खेळी करत त्याने नंबर-३च्या जागेवरील दावा मजबूत केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा आणि आक्रमक फलंदाज देवदत्त पडिक्कल याच्या बॅटची आग ओकणारी लय कायम आहे. पडिक्कलने अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन करत श्रीलंकन गोलंदाजांचा समाचार घेत सलग दुसरे खणखणीत शतक झळकावले आहे. या मालिकेतील हे त्याचे सलग दुसरे शतक असून, त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारतीय संघाची एक मोठी डोकेदुखी कायमची दूर झाली आहे, तर दुसरीकडे संघातील एका युवा खेळाडूचे मात्र टेन्शन चांगलेच वाढले आहे.
संयम, तंत्र अन् गिलची भक्कम साथ
दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात १६७ धावांची मॅरेथॉन खेळी करून सामनावीर ठरलेल्या पडिक्कलने दुसऱ्या सामन्यातही सुरुवातीपासूनच आपला दबदबा निर्माण केला. त्याने या डावात गजबचा संयम दाखवत कोणतीही घाई न करता १६८ चेंडूंचा सामना करत आपले शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे, आपल्या या शतकी खेळीदरम्यान त्याने हवेत शॉट मारून कोणताही धोका पत्करला नाही. त्याने एकही षटकार न मारता १० सणसणीत चौकारांच्या मदतीने ही मजल मारली.
या सामन्यात टीम इंडियाने अवघ्या ६६ धावांवर आपले २ गडी गमावले होते. अशा नाजूक स्थितीत पडिक्कलने कर्णधार शुभमन गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी १२० धावांची अत्यंत महत्त्वपूर्ण भागीदारी रचली आणि भारतीय संघाला एका मजबूत स्थितीत आणून ठेवले.
टीम इंडियाची नंबर ३ ची डोकेदुखी अखेर संपली
गेल्या काही काळापासून भारतीय कसोटी संघाला नंबर ३ च्या जागेवर एका भरवशाच्या फलंदाजाची नितांत गरज होती. असा फलंदाज जो फिरकी आणि वेगवान या दोन्ही प्रकारच्या गोलंदाजीचा खंबीरपणे सामना करू शकेल. पडिक्कलने सलग दोन शतके ठोकून ही मोठी समस्या जवळपास पूर्णपणे सोडवली आहे. ज्या सहजतेने तो फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांना खेळत आहे, ते पाहता त्याने कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकावर आपली जागा जवळपास पक्की केली आहे.
पुजाराच्या रेकॉर्डची बरोबरी
दरम्यान, या शतकासह त्याने २०१८-१९ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये चेतेश्वर पुजाराने परदेशी भूमीवर केलेल्या सलग दोन कसोटी शतके मारण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
साई सुदर्शनचे कमबॅक आता कठीण?
पडिक्कलच्या या सातत्यपूर्ण आणि धमाकेदार कामगिरीमुळे नंबर ३ च्या शर्यतीत असलेल्या इतर खेळाडूंचे मात्र धाबे दणाणले आहेत. यात सर्वात मोठे नाव आहे ते साई सुदर्शनचे. विशेष म्हणजे, साई सुदर्शनला दुखापत झाल्यामुळेच देवदत्त पडिक्कलला भारतीय कसोटी संघात सामील होण्याची अचानक संधी मिळाली होती. आता मिळालेल्या संधीचे पडिक्कलने ज्या प्रकारे सोने केले आहे, ते पाहता दुखापतीतून सावरल्यानंतर साई सुदर्शनला पुन्हा संघात ‘कमबॅक’ करणे आता अत्यंत मोठे आणि कठीण आव्हान असणार आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा