Ind vs Eng ODI 2026 : इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहली तब्बल सहा महिन्यांनंतर पुनरागमन करत आहे. त्याआधी माजी बॅटिंग कोच संजय बांगर यांनी २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटने घेतलेल्या विशेष सरावाचा खुलासा केला आहे. या तयारीमागचं गुपित नेमकं काय होतं, त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

दुसरीकडे, इंग्लंडच्या कठीण परिस्थितीने भारतीय टी२० संघाची पार दैना उडवलीये. श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीत खेळणाऱ्या टीम इंडियाची पहिली मॅच पावसामुळे अनिर्णित राहिली. त्यानंतर लागोपाठ तीन टी२० मॅचेसमध्ये भारताला पराभवाचा धक्का बसला असून आता टीमवर क्लीन स्वीपचं संकट घोंगावतंय. दरम्यान, भारताचे माजी बॅटिंग कोच संजय बांगर यांनी एक मोठा खुलासा केला आहे. विराट कोणत्याही मोठ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारीनेच मैदानात उतरतो, असं बांगर यांनी म्हटलंय.
“आमचा दिनक्रम खूप कठीण असायचा”
‘दूरदर्शन’च्या एका शोमध्ये बोलताना बांगर यांनाी २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाने केलेल्या तयारीचे काही रंजक किस्से शेअर केलेत. इंग्लंडमधील आव्हानं आणि त्याआधी विराटने घेतलेले अतोनात कष्ट यावर बांगरांनी उघडपणे भाष्य केलं. बांगर म्हणाले की, “जेव्हा तुम्ही इंग्लंडला जाता, तेव्हा सगळ्या गोष्टी दोनच मुद्द्यांवर ठरतात. तुम्ही स्विंग बॉल किती चांगला खेळता आणि चेंडू शरीराच्या किती जवळ (लेट) खेळू शकता. विराट कोहलीसाठी २०१४ चा इंग्लंड दौरा अतिशय वाईट ठरला होता. त्यामुळेच २०१८ च्या दौऱ्यापूर्वी विराटने आपल्या याच कमजोरीवर प्रचंड काम केलं. आमचा सराव खूप कठीण असायचा. इंग्लंडसारख्या वातावरणाचा अंदाज यावा म्हणून आम्ही सकाळी ६ किंवा ६:३० वाजताच मुंबईच्या ग्राउंडवर पोहोचायचो, जेणेकरून सकाळच्या दवबिंदूंचा (ओस) फायदा घेता येईल. खेळपट्टी न झाकता, सकाळच्या ओलाव्याचा आम्ही सरावासाठी पूर्ण वापर करायचो.”
“…आणि आम्ही खेळपट्टीवर पाणी टाकायचो!”
बांगर यांनी सरावाचा पुढचा थरार सांगताना म्हटलं की, “एकदा का ऊन पडलं आणि खेळपट्टीवरील ओलावा कमी झाला, की आम्ही चेंडू स्विंग व्हावा यासाठी मुद्दाम पिचवर पाणी टाकायचो. विराटने अशा कठीण परिस्थितीत तासनतास आणि वारंवार सराव केला. काही सेशन्ससाठी अजिंक्य रहाणेसुद्धा आमच्यासोबत जोडला गेला होता. आमच्या ३-४ मुख्य बॅट्समननी इंग्लंडसारख्याच हुबेहूब परिस्थितीतसराव करून आपली बॅटिंग सुधारली होती. याच कडक तयारीमुळे आम्ही इंग्लंडमध्ये मॅचेस जिंकण्यात यशस्वी ठरलो.”
विराटला फिटनेस क्लिअरन्सची प्रतिक्षा
विराट कोहलीला फिटनेस क्लिअरन्स मिळण्याच्या अटीवर इंग्लंडविरुद्धच्या तीन मॅचेसच्या वनडे सीरिजसाठी भारतीय संघात निवडण्यात आलंय. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना विराटच्या स्नायूंना दुखापत झाली होती. याच कारणामुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजला मुकला होता.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताची वनडे टीम
शुभमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली (फिटनेसवर अवलंबून), श्रेयस अय्यर (व्हाईस कॅप्टन), केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, गुरनूर बराड

