Headlines

15 दिवसांतच दुसरं ग्रहण येतंय! 28 ऑगस्टला आकाशात’ऑलमोस्ट ब्लड मून’; ‘शशी’चा 96 टक्के भाग ‘धरे’च्या सावलीत लपणार। Maharashtra Times


28 ऑगस्ट 2026 चे खंडग्रास चंद्रग्रहण हे विज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत विशेष आहे. यात चंद्राचा 96 टक्के भाग पृथ्वीच्या गडद सावलीत (Umbra) लपणार आहे. केवळ 4 टक्के भाग प्रकाशात राहिल्यामुळे, रेले स्कॅटरिंग (Rayleigh Scattering) या वैज्ञानिक नियमानुसार पृथ्वीच्या वातावरणातून गाळलेला लाल प्रकाश चंद्रावर पडेल आणि तो हुबेहूब ‘ब्लड मून’ सारखा तांबूस दिसेल. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

Almost Blood Moon। Maharashtra Times
सौजन्य: पिक्साबे डॉट कॉम
28 ऑगस्ट 2026 चे खंडग्रास चंद्रग्रहण होत आहे. खगोलशास्त्रात याला ‘डीप पार्शियल ल्यूनार इक्लिप्स’ म्हणतात. 15 दिवसांच्या ‘इक्लिप्स सीझन’ मधील हे दुसरे ग्रहण असून, यावेळी चंद्र पृथ्वीपासून दूर म्हणजेच ‘अपोजी’ स्थितीजवळ असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे ग्रहण सकाळी 9:43 वाजता सर्वोच्च पातळीवर असल्याने भारतात ते दिसणार नाही, परंतु डिजिटल माध्यमातून जगभरातील खगोलप्रेमी हा अद्भूत नजराणा लाईव्ह ट्रॅक करू शकतात.

जेव्हा चंद्राचा इतका मोठा भाग पृथ्वीच्या सावलीत लपतो, तेव्हा आकाशात ‘ऑलमोस्ट ब्लड मून’ चा नजराणा पाहायला मिळतो. जेव्हा केवळ 4 ते 7 टक्के भागच सूर्यप्रकाशामुळे चमकत राहील, तेव्हा उर्वरित संपूर्ण चंद्र गडद तांबूस किंवा विटकरी रंगाचा (Rusty Copper Red) दिसेल. हे घडण्यामागे ‘रेले स्कॅटरिंग’ हा वैज्ञानिक नियम काम करतो. पृथ्वीच्या वातावरणातून सूर्यप्रकाश आरपार जाताना निळा रंग विखुरला जातो आणि केवळ जास्त तरंगलांबी असलेला तांबूस-लाल प्रकाश चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचतो. यामुळेच चंद्र लाल रंगाचा भासतो.

‘इक्लिप्स सीझन’ आणि ‘अपोजी’ प्रभाव

खगोलशास्त्रामध्ये जेव्हा दोन आठवड्यांच्या अंतराने सूर्य आणि चंद्र अशी दोन्ही ग्रहणे होतात, तेव्हा त्या कालखंडाला ‘इक्लिप्स सीझन’ म्हटले जाते. चंद्राची कक्षा आणि पृथ्वीची सूर्यभ्रमण कक्षा एकमेकांना छेदत असल्याने हा दुर्मिळ योग येतो.

याव्यतिरिक्त, 28 ऑगस्टचे हे ग्रहण चंद्र आपल्या कक्षेमध्ये पृथ्वीपासून दूर म्हणजेच ‘अपोजी’ (Apogee) स्थितीच्या जवळ असताना घडत आहे. 22 ऑगस्ट रोजी चंद्र पृथ्वीपासून सर्वात दूरच्या अंतरावर असेल, ज्यामुळे या ग्रहणादरम्यान आकाशातील चंद्राचा आकार नेहमीच्या पूर्ण चंद्रापेक्षा किंचित लहान (Smaller Apparent Diameter) दिसेल. हे ग्रहण होत असताना अंतराळात चंद्राच्या मागे बॅकग्राउंडला ‘कुंभ’ (Aquarius) ही नक्षत्रांची मालिका असेल.

भारतात का दिसणार नाही?

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे ग्रहण भारतात उघड्या डोळ्यांनी पाहता येणार नाही. खगोलशास्त्रीय वेधशाळांच्या रिपोर्टनुसार, हे ग्रहण 28 ऑगस्ट रोजी जागतिक वेळेनुसार मध्यरात्री आणि पहाटे घडेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) हे चंद्रग्रहण 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:43 वाजता त्याच्या सर्वोच्च पातळीवर (Maximum Eclipse) असेल.

भारतात त्यावेळी पूर्ण सूर्यप्रकाश असेल आणि चंद्र क्षितिजाच्या खाली गेलेला असेल. त्यामुळे भारतात राहणाऱ्या खगोलप्रेमींना हा नजराणा थेट आकाशात पाहता येणार नाही. मात्र, अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि पश्चिम आशियातील देशांमध्ये हे ग्रहण मध्यरात्री अत्यंत स्पष्टपणे आणि नयनरम्य स्वरूपात दिसेल.

भारतातील नागरिकांना हा खगोलीय चमत्कार पाहण्यासाठी नासा किंवा इतर वैज्ञानिक संस्थांच्या अधिकृत युट्यूब चॅनेल्स आणि वेधशाळांच्या डिजिटल लाईव्ह स्ट्रीमिंगचा आधार घ्यावा लागेल.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णी“शुभम कुलकर्णी हे गेल्या नऊ वर्षांहून अधिक काळ मुख्य प्रवाहातील माध्यम क्षेत्रात सक्रिय असलेले एक व्यासंगी पत्रकार आहेत. सध्या ते ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या ‘टेक आणि सायन्स’ विभागात कन्सल्टंट म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. तंत्रज्ञान विश्वातील वेगाने बदलणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे प्रगत तंत्रज्ञान, नवनवीन गॅझेट्स, टेक ट्रेंड्स, स्मार्टफोन रिव्ह्यूज आणि सायन्स क्षेत्रातील क्लिष्ट वैज्ञानिक घडामोडी अतिशय सोप्या, सर्वसामान्यांना समजेल अशा रंजक भाषेत मांडण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. डिजिटल मीडियातील अचूक SEO आणि Google Discover च्या बदलत्या अल्गोरिदमचा वापर करून लाखो वाचकांपर्यंत तांत्रिक माहिती पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित ‘MGM’ संस्थेतून ‘एम.ए. पत्रकारिता आणि जनसंवाद’ ही मास्टर पदवी संपादन केल्यानंतर, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘आकाशवाणी’ या प्रतिष्ठित संस्थेतून केली. 2017 मध्ये त्यांनी ‘दैनिक सामना’ या अग्रगण्य मुखपत्रात प्रवेश करत वृत्तपत्र पत्रकारितेचा भक्कम पाया रचला. त्यानंतर मुंबईतील ABP माझा, TV9 मराठी, साम TV, पुढारी न्यूज चॅनेल आणि लोकशाही न्यूज या महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. राजधानी दिल्ली येथे ‘News Nation Marathi’ साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या न्यूज बुलेटिन्सचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या सखोल अनुभवामुळे राजकारण, व्यापार-उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, सायबर सुरक्षा आणि लाइफस्टाईल क्षेत्रातील गुंतागुंतीच्या विषयांचे अचूक विश्लेषण करणे ही त्यांची प्रमुख ओळख आहे. पत्रकारितेच्या या व्यस्त प्रवासातून वेळ काढत, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हा त्यांचा छंद आहे.”आणखी वाचा