भारतीय खेळाडूचा स्पर्धेतील पहिला विजय, बरोबरीकडे झुकलेल्या स्थितीतून उलटविले पारडे
वृत्तसंस्था, सेंट लुईस (अमेरिका) : ‘ग्रँड चेस टूर’मधील अंतिम टप्प्याआधीची स्पर्धा असलेल्या ‘सिंकफील्ड कप’मध्ये भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात जावोखिर सिंदारोव्हच्या बचावाला भेदून आपला पहिला विजय नोंदवला.
या दिवसाचा खरा नायक प्रज्ञानंद ठरला. ‘क्वीन पॉन ओपनिंग’नंतर खेळाच्या अंतिम टप्प्यात त्याने अत्यंत संयमाने आणि टप्प्याटप्प्याने आपला विजय साकारला. सिंदारोव्ह, जो या वर्षाच्या अखेरीस जागतिक विजेतेपदासाठी डी. गुकेशशी भिडणार आहे, त्याने अशा ‘एंडगेम’ची निवड केली जी त्याच्यासाठी सामना सहजपणे बरोबरीत सोडवून देऊ शकली असती. मात्र प्रज्ञानंदची जिद्द आणि चिकाटी याचा अंदाज घेण्यात कदाचित तो चुकला. अखेरीस भारतीय खेळाडूच्या या जिद्दीचे फळ मिळाले.
संगणकीय विश्लेषणानुसार जी स्थिती बरोबरीकडे झुकलेली वाटत होती ती प्रज्ञानंदने काही वेळेतच विजयात बदलली. हा सामना तब्बल 95 चालींपर्यंत रंगला. दोन सामन्यांतून 1.5 गुण प्रज्ञानंदने मिळविलेले असून आघाडीच्या गटात स्थान मिळविले आहे. दुसरीकडे, आदल्या दिवशी आघाडीवर असलेल्या अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाने हॉलंडच्या अनिश गिरीविऊद्धचा सामना बरोबरीत सोडवला. डच खेळाडू अनिश गिरी त्याच्या ‘ओपनिंग’च्या सखोल तयारीसाठी ओळखला जातो आणि त्याने आपल्या चाहत्यांची निराशा केली नाही. मात्र काऊआनानेही काळ्या मोहऱ्यांसह समर्थ खेळ केला. पहिल्या फेरीत केवळ एकच निर्णायक निकाल लागला होता, मात्र दुसऱ्या फेरीत परिस्थिती पूर्णपणे बदलली आणि चार सामन्यांचे निर्णायक निकाल लागले.
अमेरिकेच्या लेव्हॉन अरोनियनने जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरचा पराभव करून आपली गुणवत्ता सिद्ध केली, अमेरिकेच्या वेस्ली सोने हॉलंडच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्टवर वर्चस्व गाजवले आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या फ्रान्सच्या मॅक्सिम वाशिएर-लाग्रेव्हने अमेरिकेच्या सॅव्हियन सॅम्युअलचा पराभव केला.
4 लाख 75 हजार अमेरिकन डॉलर्सची बक्षीस रक्कम असलेल्या या स्पर्धेत अजून सात फेऱ्या बाकी असताना पाच खेळाडू प्रत्येकी 1.5 गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थानी आहेत. काऊआना, अरोनियन आणि वेस्ली हे तीन अमेरिकन खेळाडू प्रज्ञानंद आणि वाशिएर-लाग्रेव्ह यांच्यासोबत आघाडीवर आहेत. आता या स्पर्धेत पुढे कोण बाजी मारणार हे पाहणे त्यामुळे रंजक बनलेले आहे.
-प्रज्ञानंदसह पाच खेळाडू 1.5 गुण घेत संयुक्त आघाडीवर
-स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत चार सामने निकाली
-अरोनियन, वेस्ली सो, वॉशिएर लाग्रेव्ह यांचे प्रतिस्पर्ध्यांवर विजय
