आचरा प्रतिनिधी : ज्ञानदीप विद्यामंदिर वायंगणी हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, विद्यार्थीप्रिय शिक्षक, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश किरात पेडणेकर (वय ७५, रा. भंडारवाडी, वायंगणी) यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. मुंबई येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने मालवण तालुक्यातील वायंगणी परिसरातील शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
प्रकाश पेडणेकर यांनी शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय योगदान दिले. ज्ञानदीप विद्यामंदिर वायंगणीचे मुख्याध्यापक म्हणून अनेक वर्षे सेवा देत, त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच साहित्य, संस्कार आणि सामाजिक जाणीव रुजविण्याचे काम केले. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. ते कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवणचे कार्यकारिणी सदस्य तसेच अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवणचे कार्यकारिणी सदस्य होते. ज्ञानदीप वाचन मंदिर वायंगणी पंचक्रोशीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. माजी पंचायत समिती सदस्या प्राजक्ता पेडणेकर यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात भाऊ, बहिणी, भाचे तसेच मोठा परिवार आहे.
