अनेक लोकांची वागण्या बोलण्याची रीत अजब असते. चमत्कारिक असते. नावं ठेवणे, दुसऱ्यांच्या घरात वितंडवाद निर्माण करणे, व्यर्थ कुरापती करणे, नसत्या चौकशा करणे असल्या प्रकारात विलक्षण आनंद असतो अनेकांना! जनसामान्यांच्या अशा तऱ्हेवाईक वागण्यातील रुपके – प्रतिमा, प्रतीकं वापरून नाथांनी आध्यात्मिक आधाराने भारुडं लिहिली. तुकोबांनी परखड वाणी अभंगांच्या रूपात जगापुढे आणली. नामदेवांनी विपुल रचना केल्या. गाडगेबाबांनी कीर्तनातून लोक जागविले. मुक्ताईने ताटीच्या अभंगातून शहाणपण दिले! ही भारुडं, कूट अभंग कधी विनोदी शैलीत तर कधी परखड अन् खरमरीत शब्दांत व्यक्त होतात!
पंढरपूरच्या वाटेवर निघालेली सासू सारखी माघारी येत सुनेला सूचना करते – बजावते , दही दूध जपून ठेव, भिक्षुकास उधळमाधळ करून देऊ नको. उखळ, मुसळ, जातं जप! यावर सून सुनावते, ‘सून म्हणे बहुत निकें , तुम्ही यात्रेसि जावें सुखें, सासूबाई स्वहित जोडा, सर्व मागील आशा सोडा!’ संत तुकारामांची ही मार्मिक अभंग रचना विख्यात आहे.
गावातील विक्षिप्त वृत्तीच्या माणसांनी संत एकनाथांवर वारंवार चिखल टाकला तरी पुन:पुन्हा नाथ स्नान करून कमालीची शांत चित्तवृत्ती ठेवतात. प्रसन्न भावना जागवतात. मुखी साखर असणे आणि डोक्यावर बर्फ असणे साधावे लागते. ही साधना तशी कठीणच. अनावधानाने जीभ दातांनी चावली गेल्यास कोणी आपली बत्तीशी रागारागाने अथवा आततायीपणाने पाडत नाही, हा मजेशीर नर्मविनोदी दाखला देताना संत मुक्ताई काय सांगतात पाहा –
शब्द शस्त्रें झालें क्लेश, संती मानावा उपदेश । जीभ दातांनी चाविली, कोणें बत्तीशी तोडीली।।
मुक्ताई म्हणजे साक्षात चित्कळा (ईश्वरी चैतन्य, ज्ञान शक्ती), वेळेला आकाशीची कडाडती वीज जशी! समंजस – सालस, सोज्वळ, समतोल विचारांची अन् तितकीच परखड फटकळदेखील. समर्पक प्रतिमा, अचूक मांडणी आणि मार्मिक भाष्य हे मुक्ताईच्या रचनांचे वेगळेपण. क्रोधाने नुकसान अधिक. अपयशाला एक प्रकारे निमंत्रण मिळते. लाभ शून्य. हानी अधिक. म्हणूनच सूज्ञाने विकारांपासून अलिप्त असावे हे बरे.

