अठराव्या अध्यायाला एकाध्यायी गीता म्हणतात; ज्याचे नाव ‘मोक्षसंन्यासयोग’ असे आहे.

माउली म्हणतात, ‘किंबहुना तुमचे केले। धर्मकीर्तन सिद्धी गेले। येथ माझे जी उरले। पाईकपण।।’ ‘सगुण निर्गुण’ या सदरात गेले वर्षभर भगवद्गीतेच्या एक ते पंधरा या अध्यायांवर चिंतनाची संधी मिळाली, हे माझे भाग्य. सद्गुरू स्वामी माधवनाथ, सद्गुरू स्वामी मकरंदनाथ यांच्या प्रेरणेमुळे मी लिहू शकलो, अशी माझी दृढ श्रद्धा आहे. लोकमान्य टिळक ‘ गीतारहस्य ’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेची सुरुवात जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगाने करतात, ‘संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे। काय म्या पामरे जाणावे हे।।’ या लेखमालेत संतांच्या विचारांचा मागोवा घेत प्रत्येक अध्यायावर चिंतन करण्याचा प्रयत्न सद्गुरू कृपेने झाला.
पंधराव्या अध्यायाच्या अखेरीस गीताशास्त्र सांगून पूर्ण झाले. सोळावा व सतरावा अध्याय सातव्या आणि नवव्या अध्यायांमध्ये सांगितलेल्या विषयांचे परिशिष्ट म्हणून आला आहे. अठरावा अध्याय एकाध्यायी गीता आहे, असे म्हटले जाते. सातव्या अध्यायात भगवंतांनी मांडायला सुरुवात केलेला ज्ञानविज्ञान विचार पंधराव्या अध्यायात सांगून संपला. पंधराव्या अध्यायात सांगितलेला ‘ पुरुषोत्तमयोग ’ हा ज्ञानाची परमावधी समजला जातो. ज्ञानी पुरुषाला आत्मलाभ झाला, म्हणजे त्याला निरतिशय परमानंदाची प्राप्ती होते; त्यामुळे त्याला काही मिळवायचे शिल्लक राहत नाही, असे पंधराव्या अध्यायात भगवंतांनी सांगितले आहे. हे ज्ञान कशामुळे मिळेल व मिळाल्यावरही आडमार्गाला न जाता त्याचा क्षेम कशामुळे होईल, हे समजणे अत्यंत आवश्यक आहे.
एवढ्यासाठी ज्ञानाला अनुकूल अशी दैवी आणि प्रतिकूल अशी आसुरी संपत्ती सोळाव्या अध्यायात भगवंतांनी सांगितली. सतराव्या अध्यायात भगवंत म्हणतात, की मनुष्यमात्रांमध्ये भेद दिसतो, तसा त्याच्या सर्व कर्मांतही भेद दिसतो. सतराव्या अध्यायात स्थूल क्रियांच्या योगाने, म्हणजे श्रद्धा, आहार, यज्ञ, दान, तप यांचे त्रिविध भेद सांगितले; त्यामुळे या अध्यायाला ‘श्रद्धात्रयविभागयोग’ म्हटले आहे.
भगवान आदिनाथ पार्वती मातेला गीतेविषयी सांगतात, ‘देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्यनूतन देखिजे गीतातत्त्व हे।।’ भगवद्गीतेच्या राजमार्गावरून मार्गक्रमण करून आपले जीवन धन्य करून घेऊ या. सद्गुरूकृपेने झालेली भगवद्गीतेची सेवा त्यांच्याच चरणी समर्पित.

