Headlines

श्रीलंकेत मैदान गाजवल्यानंतर ‘जय जवान जय किसान’ सेलिब्रेशन, टॅटूमागची खरी कहाणी सांगताना ध्रुव काय म्हणाला?


Dhruv Jurel tattoo News : ध्रुव जुरेलने श्रीलंकेविरुद्ध शतक ठोकल्यानंतर ‘जय जवान, जय किसान’ टॅटू दाखवला. या सेलिब्रेशनमागची खास कहाणी त्याने स्वतः सांगितली. आजोबा आणि वडिलांशी त्याचा थेट संबंध आहे.

Dhruv Jurel Century
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात ध्रुव जुरेलने झळकावलेलं दमदार शतक आणि त्यानंतर केलेलं सेलिब्रेशन सध्या क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनलं आहे. जुरेलने शतक पूर्ण होताच आपल्या बायसेप्सवरील ‘जय जवान, जय किसान’ हा टॅटू संपूर्ण जगाला अभिमानाने दाखवला आणि चाहत्यांची मनं जिंकली. पण, त्याने हे असंच सेलिब्रेशन का केलं? यामागचं अत्यंत भावूक आणि अभिमानास्पद कारण आता खुद्द जुरेलनेच सांगितलं आहे.

असिथा फर्नांडोच्या चेंडूवर एक धाव घेत जुरेलने आपलं कसोटी शतक साजरं केलं. हवेत उडी मारून, हेल्मेट काढून त्याने आपला डावा हात उंचावला आणि बाहूवर गोंदवलेला टॅटू दाखवला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर या सेलिब्रेशनविषयी बोलताना जुरेलने एक खास खुलासा केला. तो म्हणाला, “माझे आजोबा शेतकरी होते आणि माझे वडील सैनिक होते. मी एका फौजी आणि शेतकरी कुटुंबातून आलो आहे.” कुटुंबातील याच संस्कारांची आठवण म्हणून आणि देशाचे रक्षक व अन्नदाते यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याने हा टॅटू गोंदवला आहे.

Maharashtra TimesIND vs SL 2nd Test : टीम इंडियाने आधी धावा कुटल्या, मग 3 ओव्हरमध्येच दोन विकेट्स उडवल्या; कोलंबोत श्रीलंकेची हालत खराब, ड्रेसिंग रुममध्ये राडा

पहिल्या शतकानंतर ठोकला होता सॅल्युट

ध्रुव जुरेलचे वडील नेम सिंह जुरेल हे भारतीय लष्कराचे माजी जवान आहेत. त्यांनी कारगिल युद्धात देशाची सेवा केली होती. विशेष म्हणजे, याआधी जुरेलने जेव्हा आपल्या कसोटी कारकिर्दीतलं पहिलं शतक झळकावलं होतं, तेव्हा त्याने अगदी आर्मी स्टाईलमध्ये सॅल्युट करत आपला आनंद साजरा केला होता. त्याची ही कृती त्याच्या मनातील प्रखर देशभक्तीची साक्ष देते.

जुरेलची नाबाद खेळी अन् टीम इंडियाचा दबदबा

या सामन्यात भारतीय संघाने आपल्या फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं आहे. ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत जुरेलने १७७ चेंडूंचा सामना केला आणि ९ चौकार व २ षटकारांच्या मदतीने नाबाद ११५ धावांची अत्यंत संयमी खेळी केली. जुरेलव्यतिरिक्त देवदत्त पडिक्कलनेही ११७ धावांची शतकी खेळी साकारली. तर, शुभमन गिल (५० धावा) आणि ऋषभ पंत (६३ धावा) यांनी महत्त्वाची अर्धशतकं झळकावली.

Maharashtra TimesDhruv Jurel Century News : ध्रुव जुरेलने 115 धावा कुटल्या, नाबाद राहिला; तरीही नावावर लागला नकोसा विक्रम
भारताने १३८ षटकांत ९ बाद ५०३ धावांचा डोंगर उभारत आपला डाव घोषित केला. याला प्रत्युत्तर देताना दुसऱ्या दिवसाअखेर श्रीलंकेची अवस्था ३ षटकांत २ बाद ८ अशी दयनीय झाली आहे. ते अद्याप ४९५ धावांनी पिछाडीवर आहेत.