Headlines

शिक्षकांसाठी मोठा निर्णय:TET-CTET उत्तीर्णांनाच पदोन्नती; 31 ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश




जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाचा आधार घेत शालेय शिक्षण विभागाने पदोन्नतीसाठी नवे आणि कालबद्ध वेळापत्रक निश्चित केले आहे. यानुसार टीईटी (TET) किंवा सीटीईटी (CTET) उत्तीर्ण असलेल्या पात्र शिक्षकांनाच विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक अशा पदांवर पदोन्नती दिली जाणार असून, चालू वर्षातील संपूर्ण प्रक्रिया 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिक्षक पदोन्नतीसाठी टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालकांनी 14 मे 2026 रोजी काढलेल्या पत्रावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आक्षेप घेत तो आदेश रद्द केला होता. त्यामुळे राज्यभरात पदोन्नती प्रक्रियेत एकसमान निकष लागू करण्यासाठी शासनाने नव्याने कार्यपद्धती निश्चित केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, 10 जुलै 2026 पूर्वी ज्या जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नती प्रक्रिया पूर्ण होऊन आदेश जारी झाले आहेत, त्या पदोन्नतींना शासनाने संरक्षण दिले आहे. तसेच, 14 मेच्या पत्रामुळे जे पात्र शिक्षक पदोन्नतीपासून वंचित राहिले होते, त्यांना आता पदोन्नती मिळाल्यास त्यांची सेवाज्येष्ठता मूळ ज्येष्ठतेनुसार कायम ठेवली जाणार आहे. ऑगस्टमध्येच पूर्ण होणार पदोन्नती प्रक्रिया चालू वर्षासाठी ऑगस्ट 2026 च्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर 31 ऑगस्ट 2026 पर्यंत सर्व पात्र शिक्षकांना पदोन्नतीचे आदेश देऊन प्रक्रिया पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. 2027 पासून कायमस्वरूपी वेळापत्रक पुढील वर्षापासून शिक्षक पदोन्नतीची प्रक्रिया निश्चित वेळापत्रकानुसार राबवली जाणार आहे. दरवर्षी 1 जानेवारीला तात्पुरती अथवा अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाईल. 31 जानेवारीपर्यंत हरकती निकाली काढून अंतिम यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर 15 ते 22 फेब्रुवारीदरम्यान पदोन्नती समितीची बैठक होईल आणि 31 मार्चपर्यंत पदोन्नतीचे आदेश काढले जातील. शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांना 2 मे रोजी नवीन पदावर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त केले जाणार आहे. जिल्हा परिषदांवर अंमलबजावणीची जबाबदारी या संपूर्ण प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर (CEO) सोपवण्यात आली आहे. पदोन्नती प्रक्रिया वेळेत आणि नियमानुसार पूर्ण करण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. पदोन्नतीचे नवीन वेळापत्रक चालू वर्ष (2026) : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात – पदोन्नती समितीची बैठक, 31 ऑगस्ट 2026 – पात्र शिक्षकांना पदोन्नतीचे आदेश देऊन प्रक्रिया पूर्ण 2027 पासून : 1 जानेवारी – सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध, 31 जानेवारी – अंतिम सेवाज्येष्ठता यादी जाहीर, 15 ते 22 फेब्रुवारी – पदोन्नती समितीची बैठक, 31 मार्च – पदोन्नती आदेश निर्गमित, 2 मे – नवीन पदावर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त या नव्या कार्यपद्धतीमुळे शिक्षक पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता आणि एकसमान निकष लागू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, पदोन्नतीतील विलंब कमी होऊन पात्र शिक्षकांना वेळेत न्याय मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत