Headlines

वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कुबल यांचे निधन


वेंगुर्ले, प्रतिनिधी : वेंगुर्ला कुबलवाडा येथील रहिवासी, ज्येष्ठ नेते, तथा वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष शिवाजी रमाकांत कुबल (८७) यांचे गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्याने वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. वेंगुर्ल्यातील असंख्य नागरिकांनी त्यांच्या अंत्ययात्रेस हजेरी लावली होती. त्यांच्या निधनामुळे वेंगुर्ल्याच्या राजकारणातील एका पर्वाचा अंत झाला. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

वेंगुर्ल्याच्या राजकारणातील भीष्माचार्य म्हणून ओळख असलेले शिवाजी कुबल हे वेंगुर्ले शहर आणि परिसरातील गावांमध्ये दादा या नावाने प्रचलित होते. अगदी तरुण वयात राजकारणात प्रवेश करून वयाच्या २६ व्या वर्षी ते वेंगुर्लेनगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले होते. त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत वेंगुर्ले नगर पालिकेला स्वच्छता अभियानात पुरस्कारही मिळाला होता. वेंगुर्ल्यातील राजकारणात त्यांनी अनेक युवकांना काम करण्याची संधी दिली. नगर पालिकेच्या निवडणुकावर त्यांचा मोठा पगडा होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक तथा माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे अत्यंत जxवळचे सहकारी म्हणूनही त्यांची विशेष ओळख होती. गेली अनेक वर्षे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून कार्यरत होते.
वेंगुर्ल्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. जिल्हा व राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. माजी शिक्षण मंत्री व सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचे राजकीय गुरु म्हणूनही त्यांची ओळख आहे. दीपक केसरकर यांच्या सोबतच त्यांनी स्थानिक नेतृत्वाला संधी मिळावी या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. केसरकरांच्या शिंदे शिवसेना प्रवेशावेळी सुद्धा त्यांनी केसरकर यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतरच्या काळात मात्र प्रकृतीच्या कारणामुळे ते राजकारणापासून अलिप्त राहिले. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांना राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी कुबल यांच्यामुळेच प्राप्त झाली होती.
आंबा बागायतदार म्हणूनही ते सर्वपरिचित होते. पडीक व डोंगराळ जमिनीमध्ये हापूस आंबा बागायती निर्माण करून आपल्या बागांमध्ये विविध प्रयोग यशस्वी करून त्यांनी किफायतशीर उत्पादनाचा आदर्श घालून दिला होता. कृषी क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदाणामुळे राज्य सरकारचे कृषिभूषण, कृषिरत्न असे दोन्ही सर्वोच्च पुरस्काराने ते सन्मानित झाले होते. दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे ते १५ ते २० वर्षे सिनेट मेम्बर होते. तर वेंगुर्ल्यातील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजच्या स्थानिक संचालक मंडळाचेही ते सदस्य होते. अलिबागचे लोकनेते स्व. दत्ता पाटील यांचेही ते जवळचे सहकारी होते.
त्यांच्या पश्चात पुतणे, पुतण्या, भावजया, नातवंडे असा परिवार आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत