Wardha Accident News : वर्ध्यात भीषण अपघात झाला असून यात तिघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर गावावर शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये समीर परसराम चुटे – वय २८, शुभम कवडू मेश्राम – वय २८, सुशील अरुण मस्के – वय २९ या तरुणांचा समावेश आहे. तर गंभीर जखमी कारचालक धनराज भीमराव धाबर्डे, वय ४० हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व मित्र वर्धा नजीकच्या सिंदी (मेघे) येथील रहिवासी आहेत.
यातील गंभीर जखमी धनराज धाबर्डे यांचा गुरुवारी वाढदिवस होता. या आनंदापोटी वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी सर्व मित्र नागपूर येथे कार क्रमांक एम एच १४ जी एस ९२१५ ने सिंदी (मेघे) वरून कारने नागपूरला गेले. तिथे वाढदिवसाची पार्टी केल्यानंतर कारने परत येत असताना सेलूजवळ भरधाव कार पलटी झाली.
या अपघातात शुभम मेश्राम आणि सुशील मस्के जागीच ठार झाले तर, समीर चुटे आणि कारचालक धनराज धाबर्डे गंभीर जखमी झाले होते. या अपघाताची माहिती मिळताच रुग्ण मित्र प्रज्वल लटारे यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून गंभीर जखमींना दोघांना सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर सेवाग्रामच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. पोलीसही घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. या अपघातातील जखमी दोघांनाही सेवाग्रामवरून नागपूरच्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आलं. तर जखमी धनराज धाबर्डेवर नागपूर येथे उपचार सुरू आहे.
डंपरचा अपघात, कुटुंबाचा आक्रोश… पोलिसांनी सांगितलं पुणे अपघाताचं वास्तव
वाढदिवसाची पार्टी काळ ठरली
या अपघातातील गंभीर जखमी धनराज याचा वाढदिवस असल्याने सर्व मित्रांनी आनंदात तो साजरा करण्याचं ठरवलं. त्यासाठी नागपूर येथे पार्टीचं नियोजन झालं. वाढदिवसही आनंदात साजरा झाला, मात्र परत येताना मृत्यू आपली वाट पाहत आहे याची चाहूल कुणालाच नव्हती. आनंदानंतर काहीच वेळा तिघांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच सिंदी (मेघे) गावात शोककळा पसरली आहे. तरुणांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सेलू पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

