जिल्ह्यात 22 लाखांहून अधिक लाभार्थी : रेशन वितरण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी विशेष मोहीम
बेळगाव
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढविणे, मृत व अपात्र लाभार्थ्यांची नावे रेशनकार्डमधून वगळणे व शासनाचा अन्नधान्याचा लाभ केवळ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा राज्य सरकारचा उद्देश आहे. त्यानुसार अन्न व नागरीपुरवठा विभागाने पाच वर्षांपूर्वी ई-केवायसी केलेल्या लाभार्थ्यांसाठी पुन्हा ई-केवायसी बंधनकारक केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील 22.29 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना नव्याने ई-केवायसी करावी लागणार असून उर्वरित लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हाभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यात सध्या 10.70 लाख बीपीएल, 3.24 लाख एपीएल व 68 हजार अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका असून एकूण लाभार्थ्यांची संख्या 45 लाखांपेक्षा अधिक आहे. यापैकी 22 लाख 29 हजार 900 लाभार्थ्यांच्या ई-केवायसीला 5 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. गेल्या आठवड्यात 4 लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी पुन्हा ई-केवायसी करून घेतली असली तरी तब्बल 17.59 लाख लाभार्थ्यांची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. ही प्रक्रिया 100 टक्के पूर्ण करण्यासाठी विभागाने विशेष अभियान सुरू केले आहे.
गेल्या 5 वर्षांत अनेक लाभार्थ्यांचे निधन झाले असले तरी त्यांची नावे शिधापत्रिकेत कायम राहिल्याची प्रकरणे निदर्शनास आली आहेत. अनेक कुटुंबांमध्ये रेशन घेताना एका सदस्याच्या बोटाच्या ठशावर संपूर्ण कुटुंबाचे रेशन वितरित होत असल्याने मृत व्यक्तींच्या नावावरही अन्नधान्याचा लाभ घेतला जात होता. तसेच काही ठिकाणी अपात्र व्यक्ती किंवा दुहेरी नोंदीही आढळल्या आहेत. या सर्व त्रुटी दूर करून शासनाचा अनुदानित धान्याचा लाभ केवळ पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा, हा ई-केवायसीचा प्रमुख उद्देश आहे.
बीपीएल, एपीएल आणि अंत्योदय अन्न योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक आहे. शिधापत्रिकेवरील प्रत्येक सदस्याने स्वत: उपस्थित राहून बोटांचे ठसे किंवा ओटीपीद्वारे ओळख पडताळणी करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमुळे मृत, स्थलांतरित किंवा अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळून रेशन वाटप अधिक पारदर्शक आणि अचूक होणार आहे. लाभार्थ्यांच्या सोयीसाठी सर्व रेशन वितरण दुकानांमध्ये ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
यासाठी शिधापत्रिका, कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार कार्डे व आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे. प्रत्येक सदस्याची स्वतंत्र पडताळणी केल्यानंतरच प्रक्रिया पूर्ण होणार आहे. निर्धारित वेळेत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या सदस्यांचे नाव शिधापत्रिकेतून तात्पुरते निष्क्रिय करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित सदस्याला त्या महिन्याचे रेशन मिळणार नाही. मात्र नंतर ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच त्यांचे नाव पुन्हा सक्रिय करण्यात येणार आहे. राज्य सरकारने अद्याप अंतिम मुदत जाहीर केलेली नसली तरी ऑगस्ट व सप्टेंबरदरम्यान ही मोहीम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी विलंब न करता जवळच्या रेशन वितरण दुकानात जाऊन ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.
तालुकानिहाय लाभार्थी
अ.क्र. तालुका लाभार्थी
1 बेळगाव 385074
2 खानापूर 138407
3 निपाणी 111141
4 चिकोडी 185108
5 गोकाक 176425
6 हुक्केरी 186971
7 अथणी 182802
8 कागवाड 71280
9 रामदुर्ग 135667
10 रायबाग 194359
11 सौंदत्ती 171197
12 कित्तूर 62853
13 बैलहोंगल 119166
14 मुडलगी 109450
