Headlines

युवकांचे भविष्य सुरक्षित राखण्यासाठी सरकार सज्ज


मुख्यमंत्री : ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियान सुरू

त.भा. प्रतिनिधी

पणजी : ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत  संकल्प अभियान’ या अत्यंत महत्त्वाकांक्षी राष्ट्रव्यापी मोहिमेच्या गोव्यातील राज्यस्तरीय शुभारंभाची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व संबंधित विभागप्रमुख आणि भागधारकांची एका उच्चस्तरीय आढावा बैठकीत ऑनलाईन (व्हर्च्युअली) संवाद साधत आढावा घेतला.

अभियानाची अंमलबजावणी राज्यात कोणतीही अडचण न येता आणि अत्यंत सुरळीतपणे व्हावी, यासाठी सर्व विभागांमध्ये अखंड समन्वय सुनिश्चित करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नशामुक्त भारत’ आणि ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेला गोव्याने पूर्णपणे आत्मसात केले असून, राज्य सरकार यासाठी पूर्ण ताकदीने कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘नशामुक्त गोवा’ हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व सरकारी विभागांनी केवळ नेहमीचे काम न करता, एका ‘मिशन मोड’मध्ये येऊन काम करावे, असे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या बैठकीत शिक्षण, आरोग्य, आणि समाजकल्याण विभागासह विविध सुरक्षा यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या मोहिमेच्या माध्यमातून गोव्यातील युवकांना व्यसनांपासून दूर ठेवून त्यांना देशाच्या आणि राज्याच्या विकासात योगदान देण्यासाठी प्रेरित केले जाईल. हा राज्यस्तरीय शुभारंभ संपूर्ण गोव्यात एका जनआंदोलनाचे रूप घेईल, असा विश्वासही या आढावा बैठकीत व्यक्त करण्यात आला.

चार सूत्री कार्यक्रमावर भर

राज्यातील ड्रग्ज आणि इतर अमलीपदार्थांच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चार मुख्य सूत्रांवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामध्ये  जागरूकता : तरुण पिढीमध्ये अमलीपदार्थांच्या दुष्परिणामांविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे. प्रतिबंध : शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी अमलीपदार्थांचा शिरकाव रोखण्यासाठी कडक पावले उचलणे. पुनर्वसन : व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना योग्य समुपदेशन, उपचार आणि वैद्यकीय मदत देऊन पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे. कडक अंमलबजावणी : अमलीपदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करणे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत