Headlines

बेळगावच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी


लेफ्टनंट कर्नल अमोल तोडकर यांनी भारताचे नाव उंचावले

► त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

बेळगावचे सुपुत्र व सध्या लष्करामध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून सेवा बजावत असलेले अमोल तोडकर यांनी ‘इंटरनॅशनल रेसिलिएंट एआय चॅलेंज’ ही स्पर्धा जिंकून भारताचे नाव उंचावले आहे. बेळगावच्या सुपुत्राची ही चमकदार कामगिरी बेळगावकरांसाठी अभिमानास्पद आहे.

लेफ्टनंट कर्नल अमोल तोडकर यांच्या नेतृत्वाखाली मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या (एमसीटीई) टीमने जिनिव्हा येथे झालेल्या या स्पर्धेत ‘मिस्ट्रल एआय’ची एआय मॉडेल सादर केली. या टीमने ‘ऑडिओ टू टेक्स्ट मॉडेल कॉम्प्रेशन’ श्रेणीमध्ये अव्वल स्थान पटकावले. हे मॉडेल आकाराने लहान, अधिक कार्यक्षम व बोललेल्या ऑडिओचे लिखित मजकुरात अचूक रूपांतर करणारे ठरले. एआय प्रणालीच्या कार्यक्षमतेशी तडजोड न करता कमीत कमी संगणकीय आणि ऊर्जा स्रोतांचा वापर करून त्यांनी हे मॉडेल तयार केले.

इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनची संयुक्त राष्ट्रांच्या 50 हून अधिक भागीदारांच्या सहकार्याने जिनिव्हा येथे आंतरराष्ट्रीय परिषद झाली. या परिषदेत झालेल्या स्पर्धेत लेफ्टनंट कर्नल अमोल तोडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराच्या संघाने अत्यंत नाविन्यपूर्ण असे हे मॉडेल तयार करून ही स्पर्धा जिंकली.

लेफ्टनंट कर्नल अमोल तोडकर हे बेळगावचे असून त्यांचे शालेय शिक्षण एमएसएम स्कूल दिल्लीमधून व बिशप स्कूल पुणे येथे आणि त्यानंतर बेळगावच्या केंद्रीय विद्यालयात झाले. पुढे त्यांनी एनडीएमध्ये व नंतर टीईएमध्ये प्रवेश घेतला. 2010 मध्ये त्यांनी लेफ्टनंट पदाचा पदभार स्वीकारला. आयआयटी हैदराबाद येथून त्यांनी एआय विषयामध्ये एम. टेक पदवी घेतली. मराठा कॉलनी, टिळकवाडी येथील रहिवासी कर्नल जे. एल. तोडकर व प्रतिभा तोडकर यांचे ते सुपुत्र आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत