Headlines

फुटपाथवरचा ‘ब्रुनो’ कसा झाला बॉलिवूड सिनेमातला हिरो, सुपरस्टार नागार्जुन यांच्याकडून भेटीचं आमंत्रण, भन्नाट आहे ‘ओह माय डॉग’ची पडद्यामागची गोष्ट


अभिषेक खुळे

कांदिवलीतील डहाणूकर वाडी परिसरातील एका फुटपाथकडे दिग्दर्शक अमित राय उत्सुकतेने पाहात उभे होते. मनात थोडी शंका, थोडी उत्सुकता. श्वान प्रशिक्षक सिद्धू तांबे यांनी त्यांना सांगितलं होतं, ‘तुम्हाला हवा तसा गावठी कुत्रा माझ्याकडे आहे.’ काही क्षणांत सिद्धू स्कूटरवरून आले. त्यांच्यासोबत स्कूटरवर समोर उभा होता, ब्रुनो. एका पायानं अधू असलेला, पण डोळ्यांत विलक्षण भाव असलेला हा गावठी कुत्रा पाहताक्षणीच अमित राय यांच्या मनात भरला. तेव्हाच ठरलं, ‘ ओह माय डॉग ’मधील ऑस्की हाच!
‘ओह माय डॉग’ प्रदर्शित झाल्यापासून ब्रुनोबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मानव आणि कुत्रा यांच्यातील हळव्या, निस्सीम नात्याचे चित्रण असलेल्या या चित्रपटात ब्रुनोची भूमिका विशेष ठरली आहे.

करोनाकाळात अमित राय यांच्या मनात या विषयावर चित्रपट करण्याची कल्पना रुजली. कथा आकार घेत गेली आणि त्यांना एका गावठी कुत्र्याची गरज भासली. अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतरही मनासारखा कुत्रा मिळत नव्हता. बऱ्याच जणांकडे फॅन्सी कुत्रे होते. मात्र, अमित यांना त्यांच्या मनातील गावठी ऑस्की हवा होता. भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध प्राणी प्रशिक्षक जोसेफ रिबेल्लो यांनी सिद्धू तांबे यांच्याविषयी माहिती दिली. तांबे यांच्यामार्फत ब्रुनोपर्यंत अमित राय यांचा प्रवास पोहोचला.

अनेकांनी ब्रुनोला घेण्यास विरोध केला

ब्रुनो एका पायाने अधू असल्याने आणि चित्रीकरणासाठी तो प्रशिक्षित नसल्याने अनेकांनी त्याला घेण्यास विरोध केला. मात्र, अमित राय ठाम राहिले. त्यांना ब्रुनोवर विश्वास होता. साधारण महिनाभराच्या प्रशिक्षणानंतर ब्रुनो कॅमेऱ्यासमोर उभा राहण्यासाठी तयार झाला. त्यानंतर त्यानं चित्रपटात अक्षरशः जीव ओतून काम केलं. एका महत्त्वाच्या दृश्यात त्याच्या मालकाची किडनी काढली जात असते. ब्रुनो अचानक तेथे येतो, स्ट्रेचर आणि डॉक्टरांकडे पाहतो, कमरेला लावलेल्या आयोडिनचा वास घेतो आणि डॉक्टरांवर भुंकून जणू जाब विचारतो. हे दृश्य अनेक तुकड्यांत चित्रीत करावं लागेल, असं वाटत असतानाच ब्रुनोनं तो शॉट एका टेकमध्ये दिला. अमित राय आणि अख्ख्या टीमसाठी तो अनुभव चमत्कारासारखाच होता.

अमित राय यांच्याकडे ऑस्कर हा गावठी कुत्रा आहे. इतर ब्रीड्स पाळणं ही प्रत्येकाची आवड असू शकते; मात्र पिढ्यानपिढ्या आपल्यासोबत राहिलेले गावठी श्वान स्वीकारणं अधिक महत्त्वाचं वाटतं, असं ते सांगतात. ‘आपण या श्वानांना पाळतो, खाऊ घालतो, असा एक अहंकार आपल्यात असतो. मात्र, या श्वानांचं आपल्यावरील निर्व्याज, निस्वार्थी प्रेम पाहून तो अहंकार गळून पडतो. शेवटी जाणवतं की आपण त्यांना नाही, त्यांनीच आपल्याला पाळलं आहे’, असं अमित भावूकपणे सांगतात.या चित्रपटात अमित राय यांचा मुलगा माही राय यानं अप्पूची, तर त्यांच्या पाळीव श्वान ऑस्करनं मोमोची भूमिका केली आहे. माहीची परीक्षा सुरू असल्यानं त्यानं अद्याप चित्रपट पाहिलेला नाही; परीक्षा संपल्यानंतर तो हा चित्रपट पाहणार आहे. ब्रुनो मात्र आधीच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे.‘रोड टू संगम’, ‘ओह माय गॉड-२’ यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांतून सामाजिक संदेश देणारे अमित राय या चित्रपटातूनही प्रेम, सहजीवन आणि प्राण्यांविषयीची संवेदनशीलता अधोरेखित करतात. मराठी रंगभूमीवर विजया मेहता, विजय केंकरे, राजन भिसे, वामन केंद्रे, माधव वझे, जब्बार पटेल यांच्यासारख्या दिग्गजांच्या तालमीत घडल्यानं प्रत्येक कलाकृतीत जबाबदारीची जाणीव असते, असं ते सांगतात.

Maharashtra TimesTMKOC FDA Promo: तुकाराम मुंढे इफेक्ट! ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्येही FDA चा छापा, माधवी आत्माराम भीडेला धक्का, प्रोमो व्हायरल
इथे वाचा ओह माय डॉग सिनेमाचा संपूर्ण रिव्ह्यू

२५० भटक्या श्वानांनाही संधी

ऑस्कीच्या भूमिकेसाठी ब्रुनोची निवड झाल्यानंतर ॲनिमल वेल्फेअर बोर्डकडून त्याचं रितसर नोंदणीकरण करण्यात आलं. या चित्रपटात ब्रुनोसह सुमारे २५० गावठी आणि भटके कुत्रे दिसतात. त्यातील काही विविध फाउंडेशनशी संबंधित होते. काही विकास गायकवाड यांनी उपलब्ध करून दिले. या कुत्र्यांना धावायला लावून काही दृश्ये चित्रीत करण्यात आली.

Maharashtra TimesSiddharth Bodke in Scam 2010: हंसल मेहतांच्या ‘स्कॅम २०१०’मध्ये मराठी अभिनेता साकारणार सुब्रत रॉय, झी युवाच्या मालिकेत केलेलं काम

पडद्याबाहेरही लोकप्रियता

आज ब्रुनो खऱ्या अर्थानं हिरो झाला आहे. काही स्क्रीनिंग्जला तो उपस्थित राहतो. लोक त्याला भेटतात, त्याच्यासोबत फोटो काढतात. इतकंच नव्हे, तर दक्षिणेचे सुपरस्टार नागार्जुन आणि अमला यांनीही ब्रुनोला भेटण्यासाठी हैदराबादला बोलावलं आहे.