Headlines

पंढरीच्या वारीवर काळाचा घाला!:भाविकांच्या ट्रॅक्टरला भरधाव आयशरची भीषण धडक; ट्रॅक्टरचे दोन तुकडे, एकाचा मृत्यू, 15 जखमी




आषाढी वारीसाठी नातेवाईकांना पंढरपूरकडे सोडून परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरला भरधाव आयशर मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगावजवळ सोमवारी मध्यरात्री घडलेल्या या अपघातात एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिलांसह 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की ट्रॅक्टरचे अक्षरशः दोन तुकडे झाले, तर ट्रॉली रस्त्याच्या कडेला फेकली गेली. वारीला सोडून परतताना घडली दुर्घटना प्राथमिक माहितीनुसार, महिंदळे येथील भाविक आपल्या नातेवाईकांना पंढरपूर वारीसाठी बेलदारवाडी येथे सोडून ट्रॅक्टरने गावाकडे परतत होते. रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास कजगाव परिसरात मागून भरधाव वेगाने आलेल्या आयशर मालवाहू वाहनाने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. धडकेमुळे ट्रॅक्टरचा चक्काचूर झाला. ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले, तर ट्रॉली तुटून रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. ट्रॉलीतील प्रवासी एकमेकांवर आदळल्याने अनेकजण गंभीर जखमी झाले. या भीषण अपघातात दिनकर शेनफडू भदाणे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातावेळी ट्रॅक्टरमध्ये एकूण 17 जण प्रवास करत होते. त्यामध्ये 15 पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होता. ग्रामस्थ धावले मदतीला; जखमींना रुग्णालयात दाखल अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी ट्रॉलीखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. काही वेळातच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्व जखमींना चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. इतर जखमींनाही गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. वारीच्या आनंदावर शोककळा पंढरपूर वारीसाठी नातेवाईकांना आनंदाने निरोप देऊन परतणाऱ्या भाविकांवर काही अंतरातच काळाने झडप घातल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वारीच्या उत्साहाला या दुर्घटनेमुळे दुःखाचे ग्रहण लागले आहे. पोलिसांकडून तपास सुरू घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. आयशर वाहनाचा भरधाव वेग, चालकाचे नियंत्रण सुटणे किंवा अन्य कोणते कारण या अपघातामागे आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दिनकर भदाणे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींच्या प्रकृतीबाबत त्यांच्या नातेवाईकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. आषाढी वारीच्या पवित्र वातावरणात घडलेल्या या भीषण अपघाताने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला असून, वारकरी संप्रदायातही शोक व्यक्त केला जात आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत