Headlines

नोकरी बदलणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! नवीन ‘सर्विस हिस्ट्री’ फीचरमुळे एका क्लिकवर मिळणार PF चा जुना रेकॉर्ड । Maharashtra Times


नोकरी बदलल्यानंतर अनेकदा नवीन PF खाते तयार होते. यामुळे जुना रेकॉर्ड लिंक न होण्याची किंवा सुटण्याची मोठी समस्या निर्माण होते. ही अडचण दूर करण्यासाठी EPFO ने आपल्या ई-सेवा पोर्टलवर नवीन ‘सर्विस हिस्ट्री’ फीचर आणले आहे, ज्याच्या मदतीने कर्मचाऱ्यांना जुना रेकॉर्ड सहज तपासता येईल. चला तर मग याविषयीची संपूर्ण माहिती पुढे जाणून घेऊया.

PF। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
EPFO च्या नवीन फीचरमुळे PF खातेधारकांना आता जुन्या आणि चालू कंपन्यांची माहिती एकाच ठिकाणी पाहता येणार आहे. कर्मचारी त्यांच्या UAN क्रमांकाचा वापर करून मेंबर आयडी, नोकरी सुरू केल्याची आणि सोडल्याची अचूक तारीख एका क्लिकवर पाहू शकतील. यामुळे पैसे काढताना किंवा ट्रान्सफर करताना होणारा त्रास वाचणार आहे.

अनेकदा नोकरी बदलल्यामुळे कर्मचाऱ्यांचे जुने PF खाते सध्याच्या UAN क्रमांकाशी व्यवस्थित लिंक होत नाही. यामुळे भविष्यात पैसे काढताना किंवा फंड ट्रान्सफर करताना क्लेम रिजेक्ट होण्याचा किंवा उशीर होण्याचा मोठा त्रास कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो.

नोकरदारांची हीच डोकेदुखी कायमची दूर करण्यासाठी EPFO ने आपल्या अपग्रेड केलेल्या EPFO Unified Member Portal वर ‘सर्विस हिस्ट्री’ हे विशेष मॉड्यूल सादर केले आहे.

एकाच डॅशबोर्डवर दिसणार सर्व नोकऱ्यांची हिस्ट्री

एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, या नव्या फीचरमुळे खातेधारकांना त्यांच्या संपूर्ण करिअरमधील कंपन्यांचा रेकॉर्ड एकाच डॅशबोर्डवर पाहता येईल. कर्मचारी त्यांच्या UAN क्रमांकाने लॉगिन करून जुन्या सर्व कंपन्यांचे नाव, त्यांच्याशी संबंधित सर्व मेंबर आयडी, नोकरी सुरू केल्याची तारीख आणि नोकरी सोडल्याची तारीख (Date of Exit) सहज तपासू शकतात. (REF.)

PF ट्रान्सफर आणि विड्रॉल होणार अधिक सुलभ

या सुविधेमुळे पारदर्शकता वाढणार असून कोणत्याही त्रुटी किंवा अपूर्ण माहिती कर्मचाऱ्यांना आधीच दुरुस्त करता येईल. जुन्या कंपन्यांचे रेकॉर्ड समोर असल्यामुळे ऑनलाइन फंड ट्रान्सफरची प्रक्रिया स्वयंचलित होईल आणि मृत्यू क्लेम किंवा पेन्शन सेटलमेंट जलद गतीने करणे शक्य होणार आहे.

विसरलेले PF खाते शोधण्यास होणार मदत

‘Financial Express’ने (REF.) नमूद केल्याप्रमाणे, ज्या कर्मचाऱ्यांनी UAN प्रणाली लागू होण्यापूर्वी किंवा आधार लिंक होण्यापूर्वी काम सुरू केले होते, त्यांचे जुने खाते शोधणे कठीण असायचे. हे नवीन फीचर EPFO च्या ‘E-PRAAPTI’ शी सुसंगतपणे काम करत असल्याने, कर्मचारी त्यांच्या जुन्या आणि निष्क्रिय खात्यांचा शोध घेऊन ते मुख्य खात्याशी जोडू शकतात.

ऑनलाईन ‘सर्विस हिस्ट्री’ तपासण्याची सोपी प्रक्रिया

  • सर्वप्रथम ईपीएफओच्या अधिकृत Unified Member Portal ला भेट द्या.
  • तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा.
  • मुख्य डॅशबोर्डवरील ‘View’ या टॅबवर क्लिक करा.
  • ड्रॉपडाउन मेनूमधून ‘Service History’ हा पर्याय निवडा.
  • यानंतर स्क्रीनवर तुमच्या सर्व जुन्या आणि चालू कंपन्यांचा संपूर्ण तपशील एकाच वेळी उघडेल, जो तुम्ही PDF फॉरमॅट मध्ये डाऊनलोड देखील करू शकता. (REF.)
शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा