दोडामार्ग / वार्ताहर : वन्यप्राण्यांकडून शेती-बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास वनविभागाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप शेतकरी हर्षद देसाई यांनी केला आहे. नुकसान झाल्यानंतर तातडीने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करणे अपेक्षित असताना त्यासाठी शेतकऱ्यांना वनविभागाच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याची माहिती देसाई यांनी दिली.
हर्षद देसाई हे केर गावचे रहिवासी असून त्यांनी घोटगेवाडी येथे करार पद्धतीने जागा घेऊन केळीची लागवड केली आहे. युवकांनी शेतीकडे वळावे, यासाठी शासन आणि विविध स्तरांतून आवाहन केले जात असताना प्रत्यक्ष शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान ही शेतकऱ्यांसमोरील गंभीर समस्या बनली असल्याचे देसाई यांनी सांगितले.
विशेषतः रानटी हत्तींसह इतर वन्यप्राण्यांकडून शेती-बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकरी मोठ्या कष्टाने पिकांची लागवड करून त्यांचे संगोपन करतो. मात्र, ऐन उत्पन्नाच्या काळात वन्यप्राण्यांकडून पिकांची नासधूस झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. अशा परिस्थितीत शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरते. मात्र, नुकसानभरपाईसाठी आवश्यक असलेले पंचनामेच वेळेत होत नसतील, तर शेतकऱ्यांनी दाद कुणाकडे मागायची, असा सवाल हर्षद देसाई यांनी उपस्थित केला.
वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शासनाने निश्चित केलेली प्रक्रिया आहे. त्यामुळे नुकसान झाल्यानंतर संबंधित विभागाने विलंब न करता प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती आणि त्यांची अडचण समजून घेऊन वनविभागाने सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी मागणीही हर्षद देसाई यांनी केली.
“शेतकऱ्यांच्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. पंचनामे ताटकळत ठेवण्याकडे काही अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष का असते, याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत न्याय मिळाला पाहिजे,” अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली.
दरम्यान, वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी हर्षद देसाई यांनी केली आहे. पंचनामे वेळेत न झाल्यास शेतकऱ्यांना एकत्र करून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
