![]()
निगडी येथील प्राधिकरण परिसरातील बीएसएनएलच्या भूमिगत इन्स्पेक्शन डक्टमध्ये उतरलेल्या दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. लोकमान्य हॉस्पिटलशेजारी, निर्मल विला बंगल्यासमोर ही दुर्घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. लोकमान्य हॉस्पिटलकडून भेळ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बीएसएनएल इन्स्पेक्शन डक्टमध्ये काही कामासाठी दोन तरुण उतरले होते. डक्टमध्ये उतरल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला असावा, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर दोघांचाही मृत्यू झाला. मनोज बाबुराव शिंदे (वय 26, रा. नाशिक जेल रोड, मूळ रा. सिद्धेश्वर, ता. औंढा, जि. हिंगोली) आणि अमोल अशोक शिंदे (वय 20, मूळ रा. सिद्धेश्वर, ता. औंढा, जि. हिंगोली) अशी मृतांची नावे आहेत. डक्टमध्ये ऑक्सिजनची कमतरता, विषारी वायू किंवा अन्य कारणामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन आणि वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे, साधारण वर्षभरापूर्वी याच ठिकाणी अशाच स्वरूपाची दुर्घटना घडली होती, ज्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 373/2025 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. एकाच ठिकाणी वर्षभराच्या अंतराने पुन्हा दोन जणांचा मृत्यू झाल्याने संबंधित भूमिगत डक्टमधील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डक्टमध्ये उतरण्यापूर्वी ऑक्सिजनची पातळी तपासली होती का, तसेच सुरक्षिततेच्या आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. घटनास्थळाची तांत्रिक तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनही पाचारण करण्यात आली आहे. मृत्यूमागील नेमके कारण आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
Source link
निगडीतील बीएसएनएल डक्टमध्ये दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू:वर्षभरानंतर त्याच ठिकाणी पुन्हा दुर्घटना; ऑक्सिजन पातळी न तपासल्याचा संशय
