![]()
नांदेड शहरातील तरोडा नाका परिसरातील राहुल कॉलनीत शनिवारी रात्री एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली. एका 26 वर्षीय तरुणाने आपल्या जन्मदात्या आईची क्रिकेट बॅट आणि लोखंडी रॉडने वार करून निर्घृण हत्या केली, आणि त्यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. राहुल कॉलनीतील चौथरे कुटुंबात शनिवारी रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. प्रतीक चौथरे (वय 26) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून, त्याच्या 50 वर्षीय आईचा या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. नेमके मुलाने आईची हत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्रतीकने रागाच्या भरात घरात असलेली क्रिकेटची बॅट आणि लोखंडी रॉडने आईवर भीषण हल्ला चढवला. डोक्यावर आणि शरीरावर गंभीर वार झाल्यामुळे आई रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. आईचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच प्रतीकने दुसऱ्या खोलीत जाऊन छताला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस रात्रीच्या वेळी घरातून मोठ्या प्रमाणावर संशयास्पद आवाज येत असल्याने शेजाऱ्यांना काहीतरी अनुचित घडल्याची शंका आली. त्यांनी तातडीने धाव घेऊन घराची खिडकी फोडून आत पाहिले असता, एका खोलीत आईचा रक्ताळलेला मृतदेह आणि दुसऱ्या खोलीत प्रतीक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. शेजाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस तपास सुरू घटनेची माहिती मिळताच नांदेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले व ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. घटनेच्या वेळी प्रतीकचे वडील नोकरीनिमित्त शहराबाहेर गेलेले होते. मुलाने आपल्या आईची एवढ्या क्रूरपणे हत्या का केली आणि स्वतः आत्महत्या का केली, यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.
हे ही वृत्त वाचा
माहीममध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार:फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात, साथीदाराचा शोध सुरू
माहीम परिसरात शाळा सुटल्यानंतर घरी जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला बाईकवरून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने या विकृत कृत्याचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला गप्प राहण्यास भाग पाडले होते. याप्रकरणी माहीम पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. वाचा सविस्तर
Source link
