Headlines

नदीच्या मधोमध पूल उभारणार, विरार-डहाणू चौपदरीकरण सुरू; नव्या मार्गिका, स्थानके… कसं-काय बदलणार?| Maharashtra Times


Virar-Dahanu Quadrupling: विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. वैतरणा नदीवर पूल बांधताना पर्यावरणाची काळजी घेण्यात आली आहे. लवकरच नव्या रेल्वे मार्गिका उभारून स्थानकांचाही पुनर्विकास केला जाणार आहे.

virar-dahanu quadrapuling
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: नदीच्या मधोमध पूल बांधताना साहित्याची ने-आण करण्यासाठी नदीकिनाऱ्यावरून पात्राच्या मध्यपर्यंत तात्पुरते मार्ग बनवावे लागतात. यामुळे नदीच्या पर्यावरणावर मोठा दुष्परिणाम होतो. मात्र विरार-डहाणू चौपदरीकरणाच्या कामात, वैतरणा नदीचा पर्यावरणीय ऱ्हास टाळण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने तंत्रज्ञानाच्या मदतीने नव्या युक्तीने मार्ग शोधला आहे. यासाठी विशेष रो-रो ट्रॉली तयार करून त्यावरून सामानाची ने-आण करण्यात आली. यामुळे पर्यावरणीय ऱ्हास टाळून पूल क्रमांक ९२ आणि ९३ या महत्त्वाच्या टप्प्यासह चौपदरीकरणाचे निम्मे काम पूर्ण झाले आहे.

एमयूटीपी-तीन अंतर्गत विरार-डहाणू रोडदरम्यान चार रेल्वे मार्गिका तयार करण्यासाठी वैतरणा नदीवर क्रमांक ९२ आणि ९३ हे महत्त्वाचे पूल आहेत. सध्या दोन मार्गिकांचा नवा पूल तयार करण्यात येत आहे. नवीन पुलावरून वाहतूक सुरू झाल्यावर जुन्या पूलावरील वाहतूक बंद करून त्याचे पाडकाम करण्यात येईल. क्र. ९२ या पुलाचे १९.०५ मीटर लांबीचे ३३ स्पॅन आहेत, तर क्र. ९३ या पुलाचे तेवढ्याच लांबीचे २७ स्पॅन आहे. नदीपात्राच्या मध्यभागी जाण्याकरिता पर्यायी मार्गाचा अभाव हे पूल उभारणीतील सर्वांत मोठे आव्हान होते.

Maharashtra TimesGoregaon-Mulund Link Road: पहिला उड्डाणपूल ‘मे’मध्ये, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवर कामांना वेग; जुळे बोगदे, केबल-स्टेड पुलांमुळे कोंडी फुटणार

नदीलगत दलदलीसदृश्य भाग असल्याने रस्ता उपलब्ध नाही. यामुळे मालवाहतुकीसाठी रुळांवरून धावणाऱ्या ट्रॉलीची प्रथमच निर्मिती करण्यात आली. नदीवर असलेल्या डीएफसी पुलाच्या रुळांवर ही ट्रॉली चालवण्यात आली. त्यावरून ट्रकमध्ये भरून मालाची ने-आण करण्यात आली. यामुळे कमीत कमी वेळेत नदीपात्राला धक्का न लावता पुलाचे काम सुरू आहे.

टॉप स्लॅबसह गर्डर

टॉप स्लॅबसह दोन गर्डर अशा नाविन्यपूर्ण पद्धतीने गर्डरची उभारणी करण्यात आली. त्याचे वजन सुमारे २०८ टन आहे. हे गर्डर ट्रॉलीवरून पुलाजवळ आणण्यात आले. क्रेनचा वापर करून ६५ मीटर लांबीच्या गर्डर लॉन्चरच्या मदतीने त्याची उभारणी करण्यात आली. ट्रॉलीआधारित वाहनांमुळे क्रेनची वारंवार मदत घेण्याची गरज न पडता, काम पूर्ण झाले.

Maharashtra TimesMumbai Local: आता एक्सप्रेसमुळे लोकल खोळंबणार नाही, मध्य रेल्वेचा नवा ‘प्लॅन’; टिटवाळा, आसनगाव मार्गावरील ट्रेन वेळेवर धावणार

विशेष डिझाइनने खांबाची निर्मिती

नदीत खोल पायासाठीच्या खोदकामासाठी विशेष यंत्रणा तयार करण्यात आली. या ‘पाइल बोरिंग गॅन्ट्री’ यंत्रणेला रिसर्च डेव्हलपमेंट अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने याला मान्यता दिली आहे. चार टन वजनी हातोड्यांच्या मदतीने छेदणे आणि उपसणे अशा पद्धतीने २५ ते ३० मीटर खोलीपर्यंत अचूकपणे खांब उभारण्यात आले. पूल क्र. ९३ मध्ये चार यंत्रणा बसवून एकूण १६ खांबाचे बांधकाम एकाचवेळी शक्य झाले. एक हजार २०० मिमी व्यासाच्या आठ खांबांचा समूह यात आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा