Headlines

दीड-दमडी: आपल्या प्रेमाची शप्पथ! – deed damadi tambi durai special article on development work


-तंबी दुराई

मध्यरात्र कधीच उलटून गेली होती. तो एकटाच एक रोमँटिक वेबसीरिज बघत जागा होता. घरातले सगळे झोपले आहेत याची खात्री झाल्यावर त्याने मोबाइल बाजूला ठेवला. खिडकीचा पडदा बाजूला सारून त्याने हळूच बाहेर पाहिलं. रस्त्यावर पूर्ण शुकशुकाट होता. आणि त्याला तो दिसला… साधारण तीन बाय दोनच्या आकाराचा, परंतु एखाद्या सुंदर अमिबासारखे त्याचे रूप होते.

आकाशात कधी काळे ढग चंद्राला झाकत होते, तर कधी चंद्र ढगांच्या काळेपणावर आपल्या प्रकाशाची चादर पसरवीत होता. मध्येच कधीतरी ढगांना लहर आली की ते पृथ्वीवर पाण्याचा एक फवारा मारत होते. त्या जलरेघांमध्ये चंद्र अधिकच सुंदर दिसत होता. सगळे कसे काव्यमय, तरुण मनाला भुरळ घालणारे, परंतु त्याच्यासमोर एकच ध्येय होते. त्याने पुन्हा एकदा खिडकीचा पडदा हळूच बाजूला सारला आणि त्याला प्रेमाने पाहून घेतले. तीन बाय दोन आकाराचा आणि आजच भरलेला ताजा ताजा. अजून त्याची पकड पक्की झाली नव्हती, ती पक्की होण्यापूर्वीच त्याला काम फत्ते करायचे होते. उशीर केला तर काम कठीण होणार होते. त्याने तयारी सुरू केली. अडगळीच्या खोलीचे दार त्याने आधीच उघडून ठेवले होते. तिथून त्याने कुदळ, फावडे आणि टोपले घेतले. कोणालाही चाहूल लागणार नाही, अशा सावधपणे पावले टाकीत तो बाहेर पडला.

दिवसभर लोकांनी तुडवल्यावर, गाड्यांच्या चाकांचा भार वाहून वाहून थकलेला तो रस्ता आता आपले ओलेते सौंदर्य न्याहाळत स्वस्थ पहुडलेला होता. दूधवाला सकाळी सायकलच्या हँडलला दुधाचे कॅन अडकवून ट्रिंग ट्रिंग… करत येईल, तोवर आता कोणीही डिस्टर्ब करणार नाही हे त्याला माहीत होते. त्याच्या एका मोठ्या जखमेवर आजच दुपारी पालिकेच्या लोकांनी मलमपट्टी केली होती. गेले कित्येक दिवस ती जखम तशीच उघडी होती आणि आज दुपारी तिच्यात गिट्टी भरून वरून डांबराचा लेप लावण्यात आला होता. हा लेप जरा सुकला की आणखी एखादा लेप आणि मग वरून बारीक गिट्टी. मग ही जखम भरेल. पण दुसरा लेप लागेल का? एकदा येऊन गेलेली माणसे परत येतील का? असा विचार करत पावसात भिजत तो रस्ता आपली जखम नेहमीसाठी बरी होईल अशी स्वप्ने पाहात होता.

तेवढ्यात घराबाहेर पडलेला तो कुदळ-फावडे हाती घेऊन तिथे पोहोचला. आता त्याच्या डोळ्यांसमोर तो तीन बाय दोनचा तो ताजा ताजा, अद्याप जमिनीला नीट न धरलेला, तिच्याशी एकजीव न झालेला खड्डा होता. तो आला, त्याने पाहिले आणि त्याने खणायला सुरुवात केली. तीन बाय दोनचा विस्तार आणि चांगली हातभर खोली. त्यात भरलेला मालमसाला त्याने भराभरा बाहेर काढला. सगळा माल टोपल्यात भरून रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाच्या बुंध्याजवळ त्याने ओतला. पुन्हा एकदा आपल्या मूळ रूपात आलेल्या त्या सुकुमार खड्ड्याकडे त्याने एकदा डोळे भरून प्रेमाने पाहिले आणि तो घराकडे निघाला. आपली उघडी पडलेली जखम पाहून रस्त्याने दुःखाने डोळे मिटले!

सकाळी सकाळी दूधवाला त्या खड्ड्याला अडखळून हिंदकळला. ‘अरे, कल तो इसको ठीक किया था, आज फिर वैसा के वैसा!’ असे म्हणत तो सावरला आणि कामाला लागला. हळूहळू सगळीकडे बातमी पसरली. दर पाच मिनिटाला कोणीतरी मोटरसायकलवर येऊ लागला. गळ्यात कॅमेऱ्याची भली मोठी बॅग. मग त्या खड्ड्याचे सर्व बाजूंनी फोटो. क्लिक! क्लिक! क्लिक! मग एक कॅमेरा, एक दांडके आणि एक सुकुमारी प्रकटली…

‘हा बघा हाच तो खड्डा… जो कालच भरण्यात आला होता.’ मग टीव्हीच्या पडद्यावर काल खड्डा भरतानाची दृश्ये एका स्वतंत्र चौकटीत, म्हणजे टीव्हीत आणखी एक छोटा टीव्ही! मग त्या रस्त्याचा सगळा इतिहास. तो कधी बांधला, त्याच्यावर खड्डे कधी पडले, कधी बुजवले गेले, त्यावर आत्तापर्यंत किती खर्च झाला… वगैरे वगैरे. जरा वेळाने काही राजकीय कार्यकर्ते दोघांना घेऊन आले. त्या दोघांनी कान धरून उठाबशा काढल्या. कोणीतरी त्यांच्या कानाखाली काढली. तरी ते शांतच. या सगळ्या नाट्याचेही फोटो झाले, लाइव्ह टेलिकास्ट झाले. एक कॅमेरामन उशिरा आला. कंत्राटदाराच्या कानाखाली काढतानाचे फूटेज त्याला मिळाले नाही. त्याने रिक्वेस्ट केली. मग राजकीय कार्यकर्त्यांनी त्या कंत्राटदाराच्या कानाखाली पुन्हा काढली. मग सामाजिक कार्यकर्त्यांचा एक गट आला. त्यांनी त्या खड्ड्याची आरती केली. तो खड्डा पाच वर्षांचा झाला, म्हणून काहींनी त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. त्याचेही फोटो झाले. मग पाऊस सुरू झाला. सगळी पांगापांग झाली. खड्डा मातकट रंगाच्या पाण्याने भरला आणि जाणारे-येणारे सराईतपणे खड्डा चुकवून पुढे जाऊ लागले. सगळे काही आधीप्रमाणेच सामान्य, आणि सुरळीत झाले.

पुन्हा मध्यरात्र झाली. त्याने खिडकीचा पडदा हळूच सरकावून त्या गोजिरवाण्या खड्ड्याकडे पाहिले. त्याला तिची पहिली भेट आठवली. ती आपल्याच धुंदीत आणि मस्तीत चालत येत होती. तिचे खड्ड्याकडे लक्षच नव्हते. तिचा पाय खड्यात गेला आणि तोलही गेला. त्याच्या सुदैवाने तो नेमका तिथे होता. त्याने तिला हात दिला आणि तो तिने धरला. मग स्टारबक्स, सकाळी आठ वाजताचा मल्टिप्लेक्समधला चित्रपटाचा शो आणि कोपऱ्यातल्या सीट्स वगैरे… पण मग एक दिवस तिची आई तिला म्हणाली, ‘तुला रस्त्यावरच्या खड्ड्यात ढकलेन, पण त्या ठोंब्याशी लग्न करायला परवानगी देणार नाही.’ आईपुढे तिचे काहीएक चालले नाही. एक दिवस तिने त्याला बिलगून निरोप घेतला आणि मुसमुसत म्हणाली – ‘एकाच ह्या खड्डी जणू, फिरूनी नवी पडेन मी…’ त्यावर तो म्हणाला, ‘मग मी हा खड्डा कधीच भरू देणार नाही. आपल्या प्रेमाची शप्पथ…!’

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत