Headlines

डॉक्टर मारहाण प्रकरण:नगरसेवक रमेश म्हात्रेंना जामीन, पण महाराष्ट्रात प्रवेशबंदी; थेट गोव्याला रवाना!




डोंबिवली येथील शास्त्री नगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या तीन साथीदारांची अखेर आधारवाडी कारागृहातून जामिनावर सुटका झाली आहे. न्यायालयाने काही कडक अटी आणि शर्तींवर हा जामीन मंजूर केला आहे. या अटींनुसार रमेश म्हात्रे यांना डोंबिवलीत किंवा महाराष्ट्रात थांबता येणार नसल्याने, कारागृहातून बाहेर येताच ते थेट राज्याबाहेर रवाना झाले आहेत. यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान रमेश म्हात्रे यांनी उच्च न्यायालयाकडे, ‘मला महाराष्ट्राबाहेर ठेवा, पण जामीन द्या’, अशी विशेष विनंती केली होती. न्यायालयाने त्यांची ही विनंती मान्य करत, या प्रकरणात पोलिसांकडून आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना महाराष्ट्रात प्रवेश करण्यास सक्त मनाई केली आहे. या अटीची पूर्तता करत रमेश म्हात्रे थेट गोव्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. अंजुना पोलिस ठाण्यात हजेरीची अट उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जोपर्यंत या प्रकरणात पोलिसांकडून आरोपपत्र दाखल केले जात नाही, तोपर्यंत रमेश म्हात्रे यांना गोव्यातच राहावे लागणार आहे. तसेच, त्यांना गोव्यातील अंजुना पोलिस ठाण्यात आठवड्यातून तीन वेळा हजेरी लावणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, या प्रकरणात रमेश म्हात्रे यांच्यासह तीन पुरुष आरोपींना जामीन मिळाला असला तरी, गुन्ह्यातील महिला आरोपीला अद्याप दिलासा मिळालेला नाही. ती अजूनही आधारवाडी कारागृहातच आहे. तपास जलदगतीने करण्याचे न्यायालयाचे निर्देश या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, न्यायालयाने पोलिसांना तपास अत्यंत जलदगतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामध्ये रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि इतर सर्व आवश्यक पुराव्यांचा अहवाल लवकरात लवकर न्यायालयात सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार असून, पोलिसांच्या आरोपपत्रानंतरच पुढील दिशा ठरणार आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत