Headlines

ठाणे-डोंबिवली-नवी मुंबई प्रवास सुस्साट! ४५ मिनिटं वाचणार; ऐरोली-काटई उन्नत मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला| Maharashtra Times


Dombivli to Navi Mumbai: कल्याण-शीळ मार्गावर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्गाचं काम करण्यात येत आहे. या मार्गावरील दोन टप्प्यांचं काम लवकरचं पूर्ण होणार असून जुलैमध्ये हे टप्पे वाहतुकीसाठी खुले होतील.

ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, कल्याण: ठाणे, डोंबिवली येथून नवी मुंबईकडे वाहनचालकांची जाणाऱ्या होणाऱ्या वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. कल्याण-शीळ मार्गावर उभारण्यात आलेल्या उन्नत ऐरोली ते काटई नाका मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून पहिले दोन टप्पे जुलैअखेरीस वाहतुकीसाठी सुरू केले जाणार आहेत. एमएमआरडीएकडून या मार्गासाठी अनुकुलता दाखविण्यात आली आहे.

डोंबिवली ते नवी मुंबई १५ मिनिटांत

ऐरोली-काटई उन्नत मार्ग हा एमएमआरडीए क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प मानला जातो. सुमारे १२.७१ किलोमीटर लांबीच्या या मार्गामुळे ऐरोली ते डोंबिवली दरम्यानचे अंतर सुमारे १० किलोमीटरने कमी होणार असून, प्रवासासाठी लागणारा ३० ते ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई ते डोंबिवली हे अंतर अवघ्या १५ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प मंजूर करण्यासह त्याला गती देण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

Maharashtra TimesKalyan News: श्री मलंगगडावरील पायी प्रवासही सुखदायी, पाच कोटींच्या खर्चातून कामे; साडेतीन हजार पायऱ्यांचं बांधकाम सुरू

या प्रकल्पातील ठाणे-बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग-४ या ३.४३ किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे ९२ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आहेत. तर ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोड या २.५७ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही टप्प्यांचे उद्घाटन करून ते एकाचवेळी वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे. या दोन्ही टप्प्यांमुळे महापे, शिळफाटा, कल्याण फाटा तसेच ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक जलद होणार आहे. मुलुंड-ऐरोली पूल, ठाणे-बेलापूर मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग-४ यांच्यात अखंड व जलद संपर्क निर्माण होणार असल्याने दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा वेळ, इंधन आणि प्रवासाचा खर्च वाचणार आहे.

Maharashtra TimesKalyan-Dombivli Stations: सरकते जिने गर्दीच्या वेळी बंद, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा स्थानकांत गैरसोय; तक्रार केल्याशिवाय दुरुस्तीही नाही

मालवाहतुकीला मार्गाचा मोठा फायदा

औद्योगिक क्षेत्रातील मालवाहतुकीला या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग-४ ते काटई नाका या ६.७१ किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या टप्प्याचे कामही सुरू झाले असून हा टप्पा येत्या एक ते दीड वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण १२.७१ किलोमीटरचा ऐरोली-काटई उन्नत मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. त्यानंतर नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण परिसरातील वाहतूक अधिक गतिमान होणार आहे. जुलै महिन्यात पहिला आणि दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबई महानगर प्रदेशातील दळणवळण अधिक वेगवान करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा