Headlines

घरफोडी करणाऱ्या युवकाला अटक


बैलहोंगल पोलिसांची कामगिरी : साडेपाच लाखांचे दागिने हस्तगत

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

भरदिवसा घरफोडी करणाऱ्या एका युवकाला अटक करून बैलहोंगल पोलिसांनी त्याच्याजवळून साडेपाच लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत. आपल्या घराला कुलूप लावून शेतात गेलेल्या चिवटगुंडी, ता. बैलहोंगल येथील एका शेतकऱ्याच्या घराला या युवकाने आपले लक्ष्य बनविले होते.

प्रकाश रायाप्पा मल्लूर (वय 40) राहणार चिवटगुंडी असे त्याचे नाव आहे. त्याच्याजवळून 5 लाख 49 हजार रुपये किमतीचे 58 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद यलिगार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

13 जुलै रोजी सायंकाळी महांतेश बसाप्पा बोगूर (वय 29) राहणार चिवटगुंडी या शेतकऱ्याने बैलहोंगल पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. गेल्या रविवार दि. 12 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत महांतेश व त्याचे कुटुंबीय आपल्या घराला कुलूप लावून सोयाबिनच्या पिकावर कीटकनाशक फवारण्यासाठी शेताला गेले होते.

बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने 58 ग्रॅम सोन्याचे दागिने, 48 हजार रुपये रोख रक्कम पळविल्याचे उघडकीस आले होते. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तांत्रिक पथकाच्या मदतीने बैलहोंगल पोलिसांनी त्याच गावातील प्रकाश या युवकाला अटक करून त्याने चोरलेले दागिने जप्त केले आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत