Headlines

गोठ्याच्या कामाची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेण्यासाठी 5 हजारांची लाच:कंत्राटी अभियंत्यास अटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई




वसमत तालुक्यातील किन्होळा येथे गोठ्याच्या कामाची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेऊन दुसरा व तिसरा हप्ता मिळवून देण्यासाठी 5 हजाराची लाच मागणाऱ्या वसमत पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्या विरुद्ध वसमत शहर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 8) गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. लाचलुचपत विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील किन्होळा येथील एका तक्रारदारास गाय गोठा मंजूर झाला होता. या गोठ्याचे त्यांनी बांधकामही केले होते. सदर कामाची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेऊन अनुदानाचा दुसरा व तिसरा हप्ता मिळवून देण्यासाठी कंत्राटी अभियंता गणेश गुजर याने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यावरून पोलिस उपाधिक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ता. 10 जून रोजी पडताळणी केली होती. यामध्ये गणेश याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यानंतर ता 22 जून रोजी तक्रारदार लाच देण्यासाठी त्याच्या कार्यालयात गेला असता त्याला संशय आल्याने अभियंता गणेश याने लाच स्विकारली नाही. या प्रकरणात लाचलुचपतचे निरीक्षक राजेश मलपिल्लू यांनी आज वसमत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी कंत्राटी अभियंता गणेश गुजर याच्या विरुध्द लाच मागितल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट, निरीक्षक राजेश मलपिल्लु, बालाजी तिप्पलवाड यांच्या पथकाने कंत्राटी अभियंता गणेश यास अटक केली आहे. निरीक्षक तिप्पलवाड पुढील तपास करीत आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत