Headlines

गावातले ते प्रसंग अभ्यासताना मीही हादरून गेले; ‘एक होतं माळीण’ सिनेमातील भूमिकेबद्दल अश्विनी कासारचा खुलासा


बदलापूरजवळ उभारलेल्या ‘ एक होतं माळीण ‘ चित्रपटाच्या सेटवर माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या काही ग्रामस्थांनी पाऊल ठेवलं आणि काही क्षणांसाठी काळ जणू थबकला. समोर दिसणारे वळणदार रस्ते, मातीची घरं, डोंगरमाथा, गावाची रचना… सगळं काही इतक्या बारकाईनं उभं करण्यात आलं होतं की, उपस्थित ग्रामस्थ निःशब्द झाले. काहींच्या डोळ्यांत अश्रू तरळले, तर काहींनी हरवलेल्या नातलगांच्या आठवणी सांगितल्या. त्या काळरात्रीचे भीषण क्षण पुन्हा डोळ्यांसमोर उभे राहिल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. चित्रपटाच्या टीमसाठी हा क्षण कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा ठरला; कारण त्यांनी उभारलेला सेट हा केवळ चित्रपटाचा भाग नव्हता, तर एका जिवंत इतिहासाची संवेदनशील पुनर्निर्मिती होती. नितेश नांदगावकर यांनी सिनेमाचं कलादिग्दर्शन केलं असून त्यांनी संपूर्ण सेट ११ एकरमध्ये उभारला होता.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर ३० जुलै २०१४ रोजी दरड कोसळली आणि काही क्षणांत संपूर्ण गाव मातीखाली गाडलं गेलं. पावसासाठी प्रार्थना करून आदल्या रात्री शांतपणे झोपलेले गावकरी दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या आपत्तीचे साक्षीदार ठरले. अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली, असंख्य जीव कायमचे हरपले. याच हृदयद्रावक सत्यघटनेवर आधारित ‘एक होतं माळीण‘ हा मराठी चित्रपट नुकताच महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.

Maharashtra TimesRam Gopal Varma: अजूनही NEET देताय? एआयच्या युगात घोकंपट्टी शिकवणारी शिक्षण व्यवस्थाच बंडल; राम गोपाल वर्मांची पोस्ट चर्चेत
ही घटना राजू राणे यांना अस्वस्थ करत होती. माळीणच्या वेदना पडद्यावर आणाव्यात, ही कल्पना त्यांच्या मनात रुजली. मात्र, नैसर्गिक आपत्तीवर चित्रपट करणं सोपं नव्हतं. वास्तववादी सेट, गावाची रचना, भावनिक मांडणी आणि व्हीएफएक्स यांचा मोठा आव्हानात्मक प्रवास होता. चित्रपटाच्या निर्मितीपूर्वी टीमनं माळीणमधील बचावलेल्या ग्रामस्थांशी अनेकदा संवाद साधला. त्यांच्या आठवणी, अनुभव आणि भावना जाणून घेतल्या. जवळपास दोन वर्षं हा अभ्यास सुरू होता. त्यामुळे प्रत्येक प्रसंग वास्तवाशी प्रामाणिक राहील, याची विशेष काळजी घेण्यात आली.

Maharashtra TimesEk Hota Malin: मुंबईच्या जवळ उभारण्यात आला होता ‘एक होतं माळीण’ चा सेट, दुर्घटनेतून बचावलेले ग्रामस्थ सेट पाहून निःशब्द

बदलापूरजवळ माळीण गावाचा भव्य सेट उभारण्यात आला. प्रत्येक घर, रस्ता, परिसरातील वातावरण आणि गावाची रचना हुबेहूब साकारली होती. चित्रीकरण झाल्यानंतर हा सेट हटवण्याची वेळ आली, तेव्हाही संपूर्ण युनिट भावूक झालं. गेल्या काही महिन्यांपासून त्या गावाशी, त्या वेदनेशी आणि त्या स्मृतींशी टीमचं नातं जुळलं होतं, अशी आठवण साहाय्यक निर्माते व दिग्दर्शक दत्तात्रय गायकर सांगतात. हा केवळ मनोरंजनासाठी बनवलेला चित्रपट नाही; तर महाराष्ट्राच्या सामूहिक स्मृतीतील एका काळ्याकुट्ट अध्यायाला वाहिलेली संवेदनशील आदरांजली आहे. आधुनिक व्हीएफएक्स, वास्तववादी कलादिग्दर्शन, प्रभावी छायांकन आणि भावनिक संगीताच्या साहाय्यानं माळीण दुर्घटनेची तीव्रता पडद्यावर साकारण्यात आली आहे. हा चित्रपट एका आपत्तीचीच नव्हे, तर हरवलेल्या स्वप्नांची आणि दुःखातून पुन्हा उभं राहण्याच्या मानवी जिद्दीची कहाणी सांगतो, असंही ते नमूद करतात.
संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, संकल्पना, कथा आणि पटकथा राजू राणे यांची आहे. दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी लेखन, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. प्रशांत मोहिते, अश्विनी कासार , अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर यांच्यासह अनेक कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. राजा फडतरे यांचं छायांकन, तर युवराज गोंगले यांचं गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन आहे.

वास्तववादी भूमिका साकारणं आव्हान माळीण गावातील दुर्घटनेमागील मानवी वेदना, संघर्ष आणि आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या लोकांची मानसिक घालमेल पडद्यावर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आल्याचं यातील नायिका अश्विनी कासार सांगते. यात तिनं निर्मलाची भूमिका केलीय. ‘बदलापुरात प्रस्थापित इंडस्ट्री नसतानाही तेथील टीमनं दाखवलेलं हे धाडस वाखाणण्याजोगं आहे. ही भूमिका माझ्याकडे आली, तेव्हा माळीणचे ते प्रसंग अभ्यासताना मीही हादरून गेले. एखादं काल्पनिक पात्र साकारणं वेगळं; अधिक कस लागतो तो वास्तववादी पात्र साकारण्यात! या भूमिकेशी मी कशी समरस होत गेले, माझं मलाच कळलं नाही. ती दुर्घटना अनुभवलेले गावकरी चित्रपट पाहून भावूक होतात, त्यांना त्यांच्या त्या जुन्या गावात गेल्याचा भास होतो, हेच या कलाकृतीचं यश आहे’, असंही ती सांगते.