पावसाळा सुरू झाला की निसर्गात एक वेगळाच चमक येतो. कडक उन्हाळ्यानंतर पडणाऱ्या पावसाच्या सरी मनाला आणि शरीराला सुखद गारवा देतात. पण, याच पावसाळ्यासोबत काही नकोशा समस्याही घरात डोके वर काढतात. त्यापैकीच एक मुख्य आणि अत्यंत त्रासदायक समस्या म्हणजे घरात भिरभिरणाऱ्या माशा.

माशा घरात येण्याची मुख्य कारणे
- उपायांकडे वळण्यापूर्वी माशा घरात का येतात, हे समजून घेणे गरजेचे आहे
- घरातील दमटपणा: पावसाळ्यात कपडे वेळेवर न सुकणे किंवा फरशी दमट राहणे.
- कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट: ओला कचरा जास्त वेळ उघडा राहणे.
- अन्नाचे कण उघडे असणे: डायनिंग टेबल किंवा स्वयंपाकघरात अन्नपदार्थ उघडे ठेवणे.
- पाण्याची साचलेली ठिकाणे: घराभोवती किंवा कुंडीत पाणी साचून राहणे.
माशांना पळवून लावण्यासाठी जालिम घरगुती उपाय
कापूर आणि लवंगाचा धूर
भारतीय घरांमध्ये कापूर हा पूजेसाठी वापरला जातो, पण त्याचा तीव्र सुगंध माशांना अजिबात सहन होत नाही.
कसे करावे: एका मातीच्या भांड्यात किंवा धुपाच्या पात्रात २ ते ३ कापराच्या वड्या पेटवा. त्यामध्ये ५-६ लवंगा टाका. हा धूर संपूर्ण घरात, विशेषतः स्वयंपाकघरात फिरवा.
फायदा: कापराच्या आणि लवंगाच्या उग्र वासामुळे घरातील माशा काही मिनिटांतच घर सोडून पळून जातात. तसेच यामुळे घरातील वातावरणही शुद्ध होते.
सफरचंद व्हिनेगर आणि लिक्विड सोप ट्रॅप
हा माशांना आकर्षित करून मारण्याचा एक उत्तम आणि सोपा सापळा आहे.
कसे करावे: एका काचेच्या पेल्यात किंवा बाऊलमध्ये थोडे ॲपल सायडर व्हिनेगर घ्या. त्यात डिशवॉश लिक्विडचे काही थेंब टाका आणि ते व्यवस्थित मिक्स करा. या भांड्याला वरून प्लास्टिक रॅपने झाका आणि त्याला लहान-लहान छिद्रे करा.
फायदा: व्हिनेगरच्या आंबट-गोड वासाने माशा आकर्षित होतात. छिद्रांमधून त्या आत जातात, पण लिक्विड सोपमुळे त्या द्रवाच्या पृष्ठभागावर अडकतात आणि बाहेर पडू शकत नाहीत.
तुळस आणि पुदिन्याची पाने
तुळस ही औषधी तर आहेच, पण ती एक उत्तम ‘नॅचरल रिपेलेंट’ म्हणूनही काम करते.
कसे करावे: घराच्या खिडक्या आणि दरवाजांजवळ तुळशीची आणि पुदिन्याची रोपे ठेवा. जर रोपे ठेवणे शक्य नसेल, तर पुदिन्याची पाने पाण्यात उकळून ते पाणी थंड झाल्यावर घराच्या कोपऱ्यात स्प्रे करा.
फायदा: तुळस आणि पुदिन्याचा सुगंध मानवाला आवडतो, पण माशा आणि डास या वासापासून दूर पळतात.
दालचिनी आणि निलगिरी तेल
निलगिरी , लवंग, आणि पुदिन्याचे तेल माशांना पळवण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते.
कसे करावे: घराची फरशी पुसताना पाण्यात लिंबू किंवा फिनाईलऐवजी निलगिरी तेलाचे किंवा लॅव्हेंडर तेलाचे १० ते १५ थेंब टाका. तसेच दालचिनीची पूड करून ती खिडकीच्या कडांवर टाका.
फायदा: यामुळे घरात एक छान सुगंध दरवळतो आणि माशा घराच्या आत प्रवेश करत नाहीत.
लिंबू आणि लवंगाचा वापर
हा उपाय हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्येही मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.
कसे करावे: एक लिंबू मधोमध कापून त्याचे दोन तुकडे करा. या दोन्ही तुकड्यांवर ८ ते १० लवंगा खोचा. हे लिंबाचे तुकडे डायनिंग टेबल किंवा स्वयंपाकघराच्या ओट्यावर ठेवा.
फायदा: लिंबू आणि लवंगाचे हे संयोजन माशांना अत्यंत नापसंत असते. यामुळे माशा अन्नाजवळ फिरकत नाहीत.

