दिल्ली सरकार लवकरच मंजुरी देणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या सिव्हिल लाइन्समधील फ्लॅगस्टाफ रोडवरील बंगल्याचे राज्य सरकार शासकीय अतिथीगृहात (गेस्ट हाऊस) रुपांतर करण्याच्या तयारीत आहे. अधिकृत सूत्रांनुसार, सरकार या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बंगला क्रमांक 6 इतर शासकीय अतिथीगृहांप्रमाणे विकसित केला जाईल. बाहेरून येणारे मंत्री आणि सरकारी अधिकारी तिथे राहतील. त्यांच्या या वास्तव्यासाठी शुल्कही आकारले जाईल. या प्रस्तावात पार्किंग, प्रतीक्षागृह आणि इतर आवश्यक सुविधा विकसित करण्याची योजना आहे. तथापि, या प्रस्तावाला अद्याप सरकारी पातळीवरील उच्च स्तरावरून अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे.
माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांचे हे निवासस्थान सध्या रिकामे आहे. त्याच्या देखभालीसाठी सुमारे 10 कर्मचारी तैनात असून ते दररोज रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनरसारख्या उपकरणांची स्वच्छता आणि देखभाल करतात. केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात बंगल्याच्या नूतनीकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्याच्या महागड्या आणि आलिशान नूतनीकरणामुळे भाजपने त्याला ‘शीशमहाल’ असे संबोधले होते.
