Headlines

आंबोली पर्यटनासाठी वनखात्याची टीम – Tarun Bharat


आंबोली प्रतिनिधी : आंबोली पर्यटन स्थळावर सुट्टिच्या दिवशी वाहनांच्या ट्रॅफिकसह पर्यटकांच्या हुल्लड बाजीचा सर्वांनाच फटका बसतो. याबाबत आंबोलीचे पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा यांनी पंचायत समिती मासिक बैठकीत प्रशासनाचे लक्ष वेधले. याची आंबोली वनविभागाने तात्काळ दखल घेत शनिवार रविवार पर्यटन स्थळावर वाहनांच्या ट्रॅफिकसह पर्यटकांच्या हुल्लड बाजी रोखण्यासाठी प्रमुख पर्यटन स्थळावर आपले टीम तैनात केली आहे.
आंबोली हे जिल्ह्यातील मुख्य पर्यटक स्थळ असल्याने पावसाळ्यात आंबोली घाटातील धबधबे तसेच वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यातील तसेच राज्यातील व परराज्यातील पर्यटक कुटुंबासह पर्यटनासाठी येतात. आंबोली घाटात अनेक ठिकाणी हौशी पर्यटक हे वाहने पार्कीगच्या नियमांचे उल्लंघन करुन कोणत्याही ठिकाणी वाहने उभी करुन मद्यपान करणे, हुल्लडबाजी करणे मद्यधुंद अवस्थेत इतर पर्यटकांबरोबर वाद घालणे, भांडणे करणे असे प्रकार घडतात, यामध्ये रस्त्यावरील अन्य वाहनांची गर्दी होवून वाहतुक कोंडी निर्माण होते.
तसेच रस्त्यावरुन रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहीकांना जाण्यासाठी मार्ग मोकळा होत नसल्याने काही वेळा 3 ते 4 तास रुग्णवाहीकेसारखी वाहने अडकून पडतात. परिणामी कुटुंबांना, रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. या पर्यटन स्थळांच्या माध्यमातून कर वसूली केली जाते. तथापी तशा सेवा पर्यटकांना उपलब्ध होत नसल्याने पर्यटकांमध्ये नाराजी, रोष निर्माण होवून जिल्ह्याचे व आपल्या पर्यटन स्थळांचे नाव बदनाम होते. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असला तरी अनेक ठिकाणी पोलिस यंत्रणा अपुरी पडते.
त्यामुळे आंबोली पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत हा प्रश्न उपस्थित करून पर्यटन स्थळावरील ट्रॅफिकसह पर्यटकांच्या हुल्लड बाजी रोखण्यासाठी वन खात्याने तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी आंबोली वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल यांना पत्र पाठवून तात्काळ कार्यवाही करून त्यासाठी आवश्यक वाटल्यास पोलिसांची मदत घ्यावी अशी लेखी सूचना केली. वन खात्याने याची तात्काळ दखल घेतल्याबद्दल पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा यांनी समाधान व्यक्त केले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत