पेपरफुटीच्या प्रकरणावरून राजधानी दिल्लीतील जंतरमंतर आणि एकूणच देशातील वातावरण तरुणांच्या आंदोलनानं भारून गेलं असतानाच केंद्र सरकारकडून हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसी अत्याचार कसा करण्यात आला, याच्या कहाण्या, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर गरागरा फिरवल्या जात आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून अडगळीत पडलेल्या शिक्षण क्षेत्राविषयी त्यानिमित्तानं भरभरून बोललं आणि लिहिलं जात आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘ आदर्श बाल विद्यालय ‘ ही वेब सीरिज समयोचित ठरते.
सरकारी शाळांची दुरवस्था, शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी, राजकारणाचा हस्तक्षेप आणि शिक्षकांसमोरील आव्हानं हा विषय अनेकदा चित्रपट आणि मालिकांमध्ये हाताळला गेला आहे. मात्र ‘आदर्श बाल विद्यालय‘ ही सीरिज या गंभीर विषयाला विनोद, व्यंग आणि भावनिक प्रसंगांची जोड देत प्रेक्षकांसमोर आणते. त्यामुळे ही मालिका केवळ मनोरंजनापुरती मर्यादित राहत नाही, तर शिक्षणव्यवस्थेतील वास्तवावरही नेमकं भाष्य करते मालिकेची कथा राजधानी दिल्लीच्या उपनगरातील एका मोडकळीस आलेल्या सरकारी शाळेभोवती फिरते. विद्यार्थीसंख्या घटलेली, अपुऱ्या सुविधा, प्रशासनाची उदासीनता आणि शाळेचं अस्तित्व टिकवण्याचं आव्हान अशा अनेक समस्यांनी ही शाळा वेढलेली आहे. अशा परिस्थितीत मुख्याध्यापक ज्ञानेश्वर त्रिपाठी ( के. के. मेनन ) आणि शिक्षकांची टीम शाळेला पुन्हा उभारी देण्यासाठी प्रयत्न सुरू करते. या प्रवासात अनेक हास्यास्पद प्रसंग घडतात, तर काही प्रसंग शिक्षणाच्या मूलभूत प्रश्नांवर विचार करायला भाग पाडतात. के. के. मेनन यांनी साकारलेली मुख्याध्यापकाची भूमिका मालिकेचा सर्वात मोठा आधार आहे. त्यांच्या सहज, संयमी आणि प्रभावी अभिनयामुळे पात्राला वास्तवाची किनार मिळते. गंभीर प्रसंग असो किंवा हलकाफुलका विनोद, प्रत्येक प्रसंगात त्यांनी उत्कृष्ट संतुलन राखलं आहे. अर्चना पूरन सिंह आणि नवीन कस्तुरिया यांच्यासह इतर कलाकारांनीही आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या असून कलाकारांमधील संवाद आणि टायमिंग मालिकेला अधिक रंगतदार बनवतात.
Kangana Ranaut on Gen Z:’जनरेशन गटार’; मद्यपान, अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध; कंगना रणौतची जेन झी तरुणींवर तिखट शब्दांत टीका
दिग्दर्शकानं कथानकाला वेगवान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक भागात नवा संघर्ष आणि त्यावरचा उपाय दाखवताना प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. सुरुवातीला रटाळ, संथ वाटणारी ही सात भागांची सीरिज नंतर मनाची पकड घेते, हे खरं. मालिकेतील संवाद अनेक ठिकाणी मिश्कील आहेत, तर काही संवाद थेट शिक्षणव्यवस्थेतील विसंगतींवर बोट ठेवणारे आहेत. त्यामुळे मनोरंजनासोबतच सामाजिक आशयही ठळकपणे समोर येतो.
तांत्रिकदृष्ट्याही मालिका समाधानकारक आहे. शाळेचं वातावरण, पार्श्वसंगीत आणि छायांकन कथेला पूरक ठरतं. काही भागांमध्ये कथानक थोडं संथ वाटतं आणि काही प्रसंग अपेक्षेपेक्षा अधिक नाट्यमय भासतात. मात्र, सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचं, मग ते अगदी पहिलीपासून ते दहावीपर्यंतचे का असेना, वर्तन खटकणारं वाटतं. कोणत्या शाळांमध्ये एवढे उद्धट, तिरसट आणि बावळट विद्यार्थी असतात, हा एक संशोधनाचा विषय ठरावा.
Jr NTR Injury: ज्युनियर एनटीआर सिनेमाच्या सेटवर जखमी, २ महिने विश्रांतीचा सल्ला; तर सर्जरीनंतर राम चरणच्या तब्येतीचे अपडेट समोर
आजच्या काळात सरकारी शाळा, शिक्षणाचा दर्जा आणि मुलांच्या सर्वांगीण विकासावर चर्चा सुरू असताना, शालेय शिक्षणासाठी अधिकाधिक तरतूद असणं किती गरजेचं आहे, याचं वास्तव अधोरेखित करणारी ‘आदर्श बाल विद्यालय’ सीरिज हा विषय प्रेक्षकांसमोर सहज आणि समजण्यासारख्या पद्धतीनं मांडते. एकूणच, विनोद, संवेदनशीलता आणि सामाजिक आशय यांचा समतोल साधण्यात ‘आदर्श बाल विद्यालय’ यशस्वी ठरते. हसताहसता अंतर्मुख होण्यास उद्युक्त करणारी ही सीरिज कुटुंबासह पाहण्यासारखी नक्कीच आहे.
वेब सीरिज: आदर्श बाल विद्यालय
ओटीटी: अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ
कलाकार: के. के. मेनन, अर्चन पूरन सिंह , नवीन कस्तुरिया, प्रसन्ना बिश्त, अभिमन्यू सिंग, देवेन भोजानी
दिग्दर्शक : हिमांक गौर
दर्जा: ★★★

