बिलाँगिंग’च्या प्रकाशनास ‘पेंग्विन इंडिया’चा नकार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या बहुप्रतिक्षित आत्मचरित्राच्या प्रकाशनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बऱ्याच काळापासून चर्चेत असलेले हे पुस्तक यावर्षी 10 नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार होते. सुरुवातीला ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ हे पुस्तक प्रकाशित करणार होते, परंतु आता प्रकाशकांनी नकारघंटा दर्शवल्याचे समजते. काही संपादकीय बदलांसंदर्भात लेखिका आणि प्रकाशक यांच्यात मतभेद झाल्यामुळे ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ने हे पुस्तक प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रासंबंधी निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने स्पष्टीकरण दिले आहे. आपण भारतात हे पुस्तक प्रकाशित करणार नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. ‘पेंग्विन’ प्रकाशनने एका विभागात काही संपादकीय बदल आणि वगळण्याची मागणी केली होती, परंतु लेखिकेने ही मागणी फेटाळली होती. या पुस्तकाच्या माध्यमातून सोनिया गांधी त्यांचा राजकीय प्रवास आणि 2004 मध्ये पंतप्रधानपद न स्वीकारण्याच्या त्यांच्या निर्णयाशी संबंधित अनुभव सांगणार आहेत. सोनिया गांधींनी यापूर्वी इतर पुस्तके लिहिली आणि संपादित केली आहेत. तथापि, या पुस्तकावर काम करणाऱ्यांच्या मते, हा त्यांच्या आयुष्याचा सर्वात वैयक्तिक आणि तपशीलवार वृत्तांत आहे.
