![]()
नागपूरच्या नंदनवन परिसरात पुन्हा एकदा गँगवॉरचा थरार पाहायला मिळाला असून, कुख्यात गुन्हेगार अक्षय वंजारी याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी, 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी एका बिअर बारबाहेर त्याच्यावर धारदार चाकू आणि लोखंडी हत्यारांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा बुधवारी, 26 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अक्षय वंजारी नंदनवन परिसरातील ‘सोमरस बार’मध्ये मित्रांसोबत बसला होता. याच वेळी त्याला पत्नीचा फोन आल्याने तो बारच्या बाहेर आला. बाहेर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांपैकी वंदना लांजेवार या महिलेने अचानक अक्षयच्या डोळ्यांत मिरची पावडर फेकली. त्याला काहीही दिसत नसल्याची संधी साधून प्रदीप आखरे, प्रशांत आखरे, सूरज लांजेवार आणि त्यांच्या इतर साथीदारांनी त्याच्यावर अचानक जीवघेणा हल्ला चढवला. मित्रांवरही हल्लेखोरांचा वार स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अक्षयने कशीबशी तिथून पळ काढत पुन्हा बारचा वरचा मजला गाठला आणि आत असलेल्या मित्रांना या हल्ल्याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्याचे मित्र तात्काळ त्याच्या मदतीसाठी खाली आले. मात्र आक्रमक झालेल्या या हल्लेखोरांनी अक्षयच्या मदतीला आलेल्या मित्रांवरही जोरदार हल्ला केला. या जीवघेण्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. मित्राच्या डोळ्यादेखत निर्घृण हत्या प्रदीप आखरेने लोखंडी हत्याराने, तर प्रशांत आखरे आणि सूरज लांजेवार यांनी चाकूने अक्षय वंजारीवर सपासप वार केले. यावेळी सोबत असलेल्या अश्विन रहांगडाले या मित्राने त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र हल्लेखोरांनी त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अक्षयला अश्विनने स्वतःच्या दुचाकीवरून तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु अत्यंत गंभीर दुखापत झाल्यामुळे बुधवारी, 26 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान अक्षयची प्राणज्योत मालवली. खबऱ्या असल्याच्या संशयातून हत्येचा कट या हत्येमागे अक्षय पोलिसांचा खबरी असल्याचा संशय कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. सूरज लांजेवारचा भाऊ आकाश याला नुकतेच चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली होती आणि ही माहिती अक्षयनेच पोलिसांना दिल्याचा सूरजला संशय होता. याच वादातून अक्षयला आधी धमक्या देण्यात आल्या आणि नंतर त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी सूरज लांजेवार, त्याची आई वंदना लांजेवार, प्रशांत आखरे आणि हार्दिक पालनकर या चार आरोपींना अटक केली असून, मुख्य आरोपी प्रदीप आखरेसह इतर तीन फरार आरोपींचा कसून शोध सुरू आहे. मृतक अक्षयची गुन्हेगारी पार्श्वभूमी हत्या झालेला अक्षय वंजारी हादेखील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी ‘मकोका’अंतर्गत कारवाईसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अक्षयच्या या हत्येमुळे नागपूर शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्ववाद आणि गँगवॉरचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या संपूर्ण प्रकरणामागील नेमके कारण आणि हत्येचा कट नक्की कधीपासून रचला गेला, याचा पुढील सखोल तपास नंदनवन पोलिस करत आहेत.
Source link
नागपुरात बिअर बारबाहेर कुख्यात गुंडाची निर्घृण हत्या:पत्नीचा फोन आल्याने बारबाहेर आला अन् घात झाला, उपचारादरम्यान अक्षय वंजारीचा मृत्यू
