Headlines

सावंतवाडीत गांजा विक्रीप्रकरणी तिघांना अटक


सावंतवाडी / प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे-बिलेवाडी येथे जंगलमय परिसरातील एका पडक्या घराच्या व्हरांड्यात गांजाची खरेदी-विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. या कारवाईदरम्यान एक जण फरार झाला. पोलिसांनी १९७ ग्रॅम वजनाचा गांजा तसेच दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही छापा कारवाई शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली.

या प्रकरणी चौघांविरोधात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ मधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना पोलिसांनी रात्री अटक केली असून, त्यांचा चौथा साथीदार फरार झाला आहे. अटक केलेल्यांमध्ये सुनील श्रीकांत मुदगल (वय २६, रा. अनंत पॅलेसच्या पाठीमागे, कारिवडे-पेडवेवाडी, ता. सावंतवाडी), अमर मारुती धोत्रे (वय २३, रा. कारिवडे-पेडवेवाडी, ता. सावंतवाडी) आणि चंद्रप्रकाश पलठण प्रजापती (वय ३४, रा. गवळीतिठा, सावंतवाडी; मूळ रा. भुसूडा उर्फ हनुमानगंज, जि. बस्ती, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. तर पोलिसांची चाहूल लागताच चौथा साथीदार विशाल वडर (वय २२, रा. सावंतवाडी) फरार झाला. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे-बिलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या जंगलमय परिसरातील पडक्या घराच्या व्हरांड्यात गांजाची खरेदी-विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी सायंकाळी चार वाजल्यापासून पथकाने सापळा रचला. त्यानंतर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. यावेळी संशयितांकडे असलेल्या दोन मोपेड मोटारसायकलींची तपासणी करण्यात आली. तसेच त्यांची झडती घेतली असता १९७ ग्रॅम वजनाचा, सुमारे १० हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला. चौकशीदरम्यान सदर गांजा हा फरार आरोपी विशाल वडर याने दिल्याचे अटक केलेल्या आरोपींनी सांगितले.

सदर कारवाई सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक उपनिरीक्षक सदानंद राणे, पोलीस हवालदार प्रकाश कदम, डॉमिनिक डिसोझा, राजेंद्र गोसावी, विल्सन डिसोझा आणि आशिष जामदार यांच्या पथकाने ही कारवाई केली. घटनास्थळी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे यांनीही कारवाईत सहभाग घेतला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत