Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo:काही टीव्ही मालिका अशा असतात, ज्या केवळ मनोरंजनाचं साधन न राहता कुटुंबातील एक भाग बनतात. असित कुमार मोदी निर्मित ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका याचं एक उदाहरण. समाजात घडणाऱ्या अनेक घटनांचा संदर्भ या मालिकेत पाहायला मिळतो.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत एफडीएची एन्ट्री
तर तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत माधवी भीडे ही घरगुती लोणचं आणि पापड विक्रीचा व्यवसाय करत असते. मालिका सुरू झाली तेव्हापासून माधवीच्या या व्यवसायात येणारे अडथळे, अडचणी अनेकदा दाखवण्यात आल्या आहेत. आता तिच्या या व्यवसायात अन्न व औषधी प्रशासन विभागाची एन्ट्री झाल्याचं एका प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय.
प्रोमोत पाहायला मिळतं की, आत्माराम आणि माधवी भीडे यांच्या घरी अन्न व औषधी प्रशासन विभागाचे म्हणजेच एफडीएचे अधिकारी आलेले आहेत. ते सांगतात की, तुमच्या लिंबू मिरचीच्या लोणच्यात काचेचा तुकडा सापडला आहे. त्यामुळं तुमचं लायसन्स रद्द करण्यात आलं आहे. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते आमच्या कार्यालयात येऊ सांगा…यानंतर माधवी आणि गोकुळधाम सोसायटीचा एकमेव अध्यक्ष आत्माराम भीडे आणि माधवी भीडे यांना चांगलाच धक्का बसतो…असा हा प्रोमो ,सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.
नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
तर एकानं लिहिलं की, मुंडे साहेब इथे पण पोहोचले का? . तर दुसऱ्यानं लिहिलं की,तुकाराम मुंडे इफेक्ट…अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तर अनेकांनी सध्या सुरू असलेल्या बातम्या लक्षात घेता माधवी हे स्वप्नात पाहत असेल, असा अंदाजही काही नेटकऱ्यांनी लावला आहे.
मालिकेतलं मराठमोळं जोडपं
तर टेलिव्हिजनच्या इतिहासात सर्वाधिक काळ चालणाऱ्या आणि घराघरांत लोकप्रिय ठरलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलं आहे. मात्र, या सगळ्यात गोकुळधाम सोसायटीचे “एकमेव सेक्रेटरी” आत्माराम तुकाराम भिडे आणि त्यांची सहधर्मचारीणी माधवी भिडे यांची जोडी मराठी प्रेक्षकांसाठी विशेष आणि आपुलकीची वाटते. मालिकेत अभिनेता मंदार चांदवडकर यांनी आत्माराम तुकाराम भिडे ही शिस्तप्रिय शिक्षक आणि सेक्रेटरीची भूमिका साकारली आहे, तर अभिनेत्री सोनालिका जोशी यांनी माधवी भिडे या गृहिणी व व्यवसायनिपुण स्त्रीची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यावर छापेसत्र सुरू
अन्न व औषध प्रशासनाच्या आय़ुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्वीकारली. त्यानंतर राज्यभरातील औषध कंपन्यांसह हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यावर छापेसत्र सुरू झाले. त्यातून सामान्य नागरिकांना चांगल्या दर्जाचे अन्न मिळावे, या हेतूनं मुंढे यांच्या कारवाईनं राज्यातील हॉटेल चालकांपासून ते दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादकांचे; तसंच औषध कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. त्याशिवाय आता छोट्या मोठ्या हॉटेल, रेस्टॉरंटवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच भाग पुण्यासह विभागातील सातारा जिल्ह्यात ‘एफडीए’च्या अन्न विभागानं कारवाई सुरू केली आहे.
Chhaya Kadam Interview: खासगी आयुष्य प्रकाशझोतापासून दूर ठेवायचंय, मोठ्या रिॲलिटी शोला दिलेला नकार; स्पष्टच बोलल्या छाया कदम
कारवाई दरम्यान, तीन लाख ४८ हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा जप्त करून संबंधित पाच जणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ग्राहकांना अन्न पदार्थाचा दर्जा अथवा स्वच्छतेबाबत काही तक्रार असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावर १८००२२२३६५ नोंदवावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

