Headlines

सर्पदंश झालेल्या गरोदर महिलेला जीवदान:सर्पदंश डॉक्टरांनी वाचवले आई अन् बाळाचे प्राण




छत्रपती संभाजीनगर येथील मेडिकव्हर रुग्णालयात सर्पदंश झालेल्या एका गरोदर महिलेवर डॉक्टरांच्या पथकाने यशस्वी उपचार केले. या उपचारामुळे आई आणि गर्भातील बाळाचे प्राण वाचले असून, महिलेची प्रकृती आता स्थिर आहे. सर्पदंश झाल्यानंतर या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्पविषाचा शरीरावर होणारा परिणाम लक्षात घेऊन तिच्यावर त्वरित उपचार सुरू करण्यात आले. गर्भावस्थेमुळे आईच्या आरोग्यासोबतच गर्भातील बाळाच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेणे आवश्यक होते. या आव्हानात्मक परिस्थितीत डॉ. अविनाश कचरे (आपत्कालीन तज्ञ), डॉ. जानकीदेवी बोराडे (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. राहुल गोसावी (बालरोग तज्ञ), डॉ. उमेश गवळी (अतिदक्षता तज्ञ) आणि डॉ. निनाद धोकटे (भूल तज्ञ) यांच्या पथकाने समन्वयाने उपचार केले. त्यांच्या तातडीच्या निर्णयक्षमतेमुळे आणि एकत्रित प्रयत्नांमुळे रुग्णाला योग्य उपचार मिळाले. गरोदर महिलेला सर्पदंश झाल्यास परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. त्यामुळे अशा वेळी घरगुती उपाय किंवा उपचारास विलंब न करता तातडीने वैद्यकीय मदत घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला शक्य तितक्या लवकर सुसज्ज रुग्णालयात दाखल केल्यास योग्य उपचार मिळण्याची शक्यता वाढते. मेडिकव्हर रुग्णालयाचे सेंटर हेड डॉ. विशाल कुटे यांनी सांगितले की, “सर्पदंशामुळे आई आणि गर्भातील बाळासमोर मोठे संकट निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत वेळेवर निदान, तातडीने योग्य उपचार आणि विविध वैद्यकीय तज्ज्ञांमधील उत्तम समन्वय महत्त्वाचा असतो. आमच्या डॉक्टरांच्या पथकाने जबाबदारीने उपचार करून रुग्णाला या गंभीर परिस्थितीतून सुखरूप बाहेर काढले.”



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत