माउलींना कासवीची करुणामय दृष्टी मागितली. अजान वृक्षाची गळाभेट घेतली. गाथा मंदिरात शब्दांच्या देवाचं दर्शन घेतलं.

ओवी आणि अभंगाच्या प्रवाहात वाहत राहिलो. संतांची सावली अनुभवली. वारीची तंद्री अनुभवली. निर्मळ मनाची जादू पाहिली. सुरुवात लडखडत झाली. शेवटचा दिस गोड झाला. केवढा गोतावळा. केवढं मयाळपण. केवढा एकोपा. केवढं आपलेपण. भक्तीची तुरटी फिरली. सगळा गाळ तळाशी बसला. केवढा गगनभेदी कल्लोळ. केवढा आकांत भोवताली. पण भजनात मन शांत होत गेलं. अढी सुटली काळजातली. डोळ्यातला मिठाचा खडा वितळला. दरुषणाची आस सुटली नाही.
माहेरची आठवण विरली नाही. टाळ चिपळ्यांच्या झंकारात पावलं थकली नाही. पायातल्या साखळ्या निखळल्या. सुस्वर पाखरांची प्रार्थना ऐकली. झाड कमरेवर हात ठेवून उभं राहिलं. तिथं माथा टेकवला. गर्द पानांचा संभार पाहिला. हिरव्या पानात हिरवी चिमणी शोधण्याची धडपड केली. पिवळ्या पानात पिवळ्या चिमणीचा अदमास घेतला. ज्ञानोबांचे तुकोबांचे शब्द माझ्यासाठी हिरव्या पिवळ्या चिमण्याच. मी त्यांच्यातली सळसळ ऐकण्याची आस बाळगली. करुणेचं पाणी ओंजळीत घेतलं. डोळस श्रद्धा जपली. भक्ती तर्काच्या तराजूत तोलता येत नाही, हे शिकलो.
टाळ आणि घोंगडी जपून ठेवली. समष्टीच्या दुःखमुक्तीचा ध्यास घेतलेल्या सिद्धार्थाची यात्रा समजून घेतली. मुक्या जगाच्या दुःखाचा दुभाषी होण्याचं स्वप्न मनात जपलं. कबीरांनी सांगितलेलं सत्य, प्रेम, नम्रता आणि सेवाभावाचं मूल्य समजून घेतलं. हरिभेटीसाठी निघाल्यावर अपार प्रेमानं भारलेली पोह्याची पुरचुंडी सोबत नेण्याचा संकल्प केला. सगळे मला माउली म्हणतात… मी सगळ्यांना माउली म्हणतो. मनात हा समतेचा झरा जिवंत राहो, अशी तुकोबाचरणी प्रार्थना केली.
संत एकनाथ माउलींकडून क्षमाशीलतेची कास धरण्याची खूणगाठ बांधली. मानवतेचा दिवा मनात कायम तेवावा म्हणून माउली नामदेवराय, संत चोखामेळा , संत सेना महाराज यांच्या शब्दउजेडात चालत राहिलो. भेदाभेद अमंगळ हे कायम लक्षात ठेवलं. शब्दांचा देव भेटला. भरून पावलो. आता हरिदर्शनाची आस लागलीय. वारीचे वेध लागलेत. चंद्रभागेची आठवण येतेय. वाढवेळ झाला. आता माहेरची वाट खुणावतेय…

