श्रावण महिना आला की वातावरणात भक्ती, उत्साह आणि पारंपरिक पदार्थांची चव पसरते. या पवित्र महिन्यात अनेक जण उपवास करतात. उपवासाच्या दिवशी नेहमीच्या जेवणाऐवजी शरीराला ऊर्जा देणारे आणि उपवासाच्या नियमांमध्ये बसणारे पदार्थ बनवले जातात. अशाच लोकप्रिय फराळाच्या पदार्थांपैकी एक म्हणजे साबुदाणा वडा.

अनेकांना साबुदाणा वडा करताना तो तेलात फुटण्याची किंवा कुरकुरीत न होण्याची समस्या येते. पण योग्य पद्धतीने साबुदाणा भिजवला आणि मिश्रण तयार केले तर वडा बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मऊ तयार होतो. चला तर जाणून घेऊया श्रावण उपवासासाठी खास कुरकुरीत साबुदाणा वडा बनवण्याची सोपी पद्धत. (फोटो सौजन्य :- @bharatzkitchen HINDI)
शेंगदाण्याची तयारी
साबुदाणा वड्याची खरी चव वाढवण्याचे काम शेंगदाणे करतात. शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्या. थंड झाल्यानंतर त्याची जाडसर पूड करून घ्या.शेंगदाण्याची पूड खूप बारीक करू नये. थोडे कण राहिल्यास वड्याला छान कुरकुरीतपणा आणि खमंग चव मिळते. तसेच शेंगदाणे मिश्रणाला बांधणी देण्यास मदत करतात.
साबुदाणा वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- साबुदाणा – १ कप
- उकडलेले बटाटे – ३ ते ४ मध्यम आकाराचे
- भाजलेले शेंगदाणे – ½ ते ¾ कप
- हिरव्या मिरच्या – २ ते ३
- जिरे – १ चमचा
- कोथिंबीर – बारीक चिरलेली
- लिंबाचा रस – १ चमचा
- साखर – चिमूटभर (आवडीनुसार)
- उपवासाचे मीठ – चवीनुसार
- काळी मिरी पूड – थोडी
- तेल किंवा तूप – तळण्यासाठी
साबुदाणा वड्याचे मिश्रण तयार करण्याची पद्धत
एका मोठ्या भांड्यात भिजवलेला साबुदाणा घ्या. त्यामध्ये उकडलेले बटाटे सोलून चांगले मॅश करून घाला.आता त्यात भाजलेल्या शेंगदाण्याची पूड, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिरे, कोथिंबीर, लिंबाचा रस, काळी मिरी पूड, साखर आणि उपवासाचे मीठ घाला.सर्व साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करा. मिश्रण एकजीव झाले पाहिजे. मिश्रण खूप सैल वाटत असेल तर त्यात थोडी शेंगदाण्याची पूड वाढवू शकता.आता या मिश्रणाचे समान आकाराचे गोळे तयार करा. हाताला थोडे पाणी किंवा तूप लावून गोळ्यांना गोल वड्याचा आकार द्या.
कुरकुरीत साबुदाणा वडा बनवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
१. साबुदाणा जास्त ओला ठेवू नका
साबुदाणा वड्याचे मिश्रण चिकट होण्याचे मुख्य कारण म्हणजे जास्त पाणी. त्यामुळे साबुदाणा भिजवल्यानंतर उरलेले पाणी पूर्णपणे काढणे आवश्यक आहे.
२. शेंगदाण्याची पूड योग्य प्रमाणात घाला
शेंगदाण्यामुळे वड्याला चव तर मिळतेच, पण मिश्रण घट्ट राहण्यास मदत होते. त्यामुळे वडा तेलात फुटत नाही.
३. बटाट्याचे प्रमाण योग्य ठेवा
बटाटे जास्त झाले तर वडा मऊ होतो आणि कुरकुरीतपणा कमी होतो. त्यामुळे साबुदाण्याच्या प्रमाणात बटाटे वापरणे योग्य आहे.
साबुदाणा वडा रेसिपी
साबुदाणा वडा रेसिपी
४. तळण्यापूर्वी वडा थोडा वेळ ठेवा
तयार केलेले वडे १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवा. यामुळे ते घट्ट होतात आणि तळताना तुटत नाहीत.
५. तेल योग्य तापमानावर असावे
तेल खूप गरम असेल तर वडा बाहेरून पटकन लाल होईल पण आतून कच्चा राहू शकतो. मध्यम आचेवर वडे तळल्यास ते समान प्रमाणात कुरकुरीत होतात.
साबुदाणा वडा तळण्याची पद्धत
कढईमध्ये पुरेसे तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यावर तयार केलेले वडे सावधपणे तेलात सोडा.वडे एका बाजूने सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. त्यानंतर पलटून दुसरी बाजूही छान तळून घ्या.वडे दोन्ही बाजूंनी खरपूस झाले की ते बाहेर काढा आणि टिश्यू पेपरवर ठेवा, जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.

