Headlines

विस्मरणत गेलेली एक पारंपरिक रेसिपी उंडेऱ्याची खीर, स्मिता ओक आजीने शेअर केली रेसिपी – how to make underyachi kheer at home easy recipe shared by smita oak


उंडेऱ्याची खीर ही केवळ एक गोड पदार्थाची रेसिपी नाही, तर आपल्या खाद्यसंस्कृतीची आठवण आहे. पूर्वी सणासुदीला उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यापासून घरातील महिला किती कल्पकतेने पदार्थ तयार करत असत, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

Underyachi Kheer Recipe
Underyachi Kheer Recipe
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जुन्या, घरगुती आणि पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या पाककृती मात्र हळूहळू विस्मरणात जात आहेत. अशाच एका जुन्या आणि वैशिष्ट्यपूर्ण पदार्थाची आठवण करून देणारी ‘उंडेऱ्याची खीर’ ही रेसिपी स्मिता ओक आजींनी शेअर केली आहे. त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईकडून दर गणपती आणि गौरीच्या सणाला ही खीर आवर्जून केली जायची. कमी साहित्य, साधी कृती आणि अप्रतिम चव हे या खिरीचे वैशिष्ट्य आहे. उंडेऱ्याची खीर वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. मात्र या खिरीची खासियत म्हणजे तांदळाच्या पिठाची उकड करून त्याचे छोटे-छोटे गोळे तयार केले जातात. हे गोळे दुधात शिजवले की दूध घट्ट होत जाते आणि खिरीला बासुंदीसारखी सुंदर पोत मिळते. पूर्वी या पदार्थात काजू-बदामासारखे ड्रायफ्रूट्सही घातले जात नसत. केवळ वेलचीचा सुगंध आणि दुधाची श्रीमंती एवढ्याच साध्या साहित्यावर ही खीर तयार केली जायची. (फोटो सौजन्य :- @Smita Oak vlogs)

उंडेऱ्याची खीर बनवण्यासाठी साहित्य

उंडेऱ्याची खीर बनवण्यासाठी साहित्य

स्मिता ओक आजींच्या पद्धतीनुसार ही खीर करण्यासाठी फार मोठी यादी लागत नाही. साधारणपणे खालील साहित्य पुरेसे आहे.
तांदळाचे पीठ – पाऊण वाटी
पाणी – पाऊण वाटी
तूप – १ चमचा
साखर – थोडीशी, उकडीसाठी
दूध – १ लिटर
केशर – आवडीनुसार
वेलची पूड – चवीनुसार
साखर – खिरीसाठी आवश्यकतेनुसार
काजू-बदामाचे तुकडे – ऐच्छिक

सर्वप्रथम तांदळाच्या पिठाची उकड

सर्वप्रथम तांदळाच्या पिठाची उकड

उंडेऱ्याच्या खिरीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तांदळाच्या पिठाची उकड. मोदकांसाठी जशी उकड काढली जाते, अगदी त्याच पद्धतीने ही उकड तयार करायची आहे.एका पातेल्यात पाऊण वाटी पाणी घ्यावे. त्यात एक चमचा तूप आणि चवीपुरती थोडी साखर घालावी. खीर गोड असणार असल्यामुळे उकडीलाही थोडी गोडी यावी, या उद्देशाने साखर घातली जाते.पाण्याला चांगली उकळी आली की त्यात पाऊण वाटी तांदळाचे पीठ घालावे आणि लगेच व्यवस्थित ढवळून घ्यावे. पीठ पाण्यात एकजीव झाले की पातेल्यावर झाकण ठेवावे आणि गॅस बंद करावा.ही उकड साधारण दहा मिनिटे झाकून ठेवावी. त्यामुळे ती थोडी गार होईल आणि हाताने मळणे सोपे जाईल.

उकड मऊसर मळून घ्या

उकड मऊसर मळून घ्या

दहा मिनिटांनंतर उकड ताटात काढून घ्यावी. आता ती चांगली मळून घेणे महत्त्वाचे आहे. गरज भासल्यास हाताला थोडे पाणी किंवा तूप लावून उकड मळता येते.तांदळाच्या पिठाची गुणवत्ता आणि प्रकार यानुसार पाण्याचे प्रमाण थोडेफार बदलू शकते. त्यामुळे उकड खूप कोरडी वाटत असल्यास पाण्याचा हलका हात लावून ती मळावी. उकड छान मऊ आणि एकजीव झाली पाहिजे. ही उकड मोदकांसाठी वापरल्या जाणाऱ्या उकडीसारखीच मऊसर असावी. कारण पुढे त्याचे छोटे गोळे तयार करायचे आहेत.

तयार करा छोटे-छोटे उंडे

तयार करा छोटे-छोटे उंडे

उकड चांगली मळून झाली की तिचे अगदी छोटे-छोटे गोळे करून घ्यावेत. हे गोळे फार मोठे करू नयेत. खीर खाताना छोटे गोळे असतील तर ते खाण्यास अधिक मजा येते.स्मिता ओक आजींच्या सांगण्यानुसार हे गोळे साधारण द्राक्षाएवढ्या आकाराचे ठेवले तर योग्य ठरतात. सर्व उकडीचे छोटे गोळे तयार करून बाजूला ठेवावेत.

दुधाला द्या छान उकळी

दुधाला द्या छान उकळी

आता एका जाड बुडाच्या कढईत एक लिटर दूध घ्यावे. दूध साईसकट वापरल्यास खीर अधिक घट्ट आणि श्रीमंत होते. दूध गरम करताना त्यातील साय व्यवस्थित दुधात मिसळून घ्यावी.दुधाला चांगली उकळी आल्यानंतर ते साधारण पाच मिनिटे उकळू द्यावे. त्यामुळे दुधाची चव अधिक खुलते आणि खिरीला चांगली घट्टपणा मिळण्यास मदत होते.यानंतर तयार केलेले तांदळाच्या पिठाचे छोटे गोळे हळूहळू दुधात सोडावेत. गोळे टाकताना ते एकमेकांना चिकटणार नाहीत याची काळजी घ्यावी.

गोळे शिजू द्या

गोळे शिजू द्या

तांदळाच्या पिठाचे सर्व गोळे दुधात टाकल्यानंतर ते साधारण पाच ते सात मिनिटे उकळू द्यावेत. या काळात गोळे व्यवस्थित शिजतील आणि त्यातील तांदळाचे पीठ दुधाला घट्टपणा देईल.गोळे शिजत असताना खीर हळूहळू घट्ट होताना दिसेल. दुधाची साय कढईच्या कडेला जमा झाली तर ती फेकून देऊ नये. ती अलगद काढून पुन्हा खिरीत मिसळावी. यामुळे दुधाचा प्रत्येक थेंब पदार्थात वापरला जातो आणि खीर आणखी स्वादिष्ट होते.

थंड झाल्यावर खीर आणखी घट्ट होते

थंड झाल्यावर खीर आणखी घट्ट होते

गॅस बंद केल्यानंतर खीर सुरुवातीला थोडी पातळ वाटू शकते. मात्र त्याची चिंता करण्याची गरज नाही. खीर थंड होत गेल्यावर ती आपोआप आणखी घट्ट होते.तयार झालेली उंडेऱ्याची खीर दिसायला अगदी बासुंदीसारखी लागते आणि त्यामधील छोटे-छोटे तांदळाच्या पिठाचे गोळे द्राक्षांसारखे सुंदर दिसतात. प्रत्येक घासात मऊ गोळा, दुधाची गोडी, वेलचीचा सुगंध आणि केशराची हलकी चव जाणवते.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा