Headlines

वाखरीत बिबट्यासाठी पिंजरा नाहीच, 8 दिवसांतील हल्ल्यात 4 शेळ्या ठार:कॅमेऱ्यात बिबट्या कैद होऊनही वन विभागाचे सुरक्षेकडे दुर्लक्ष‎


.

पंढरपूर तालुक्यातील वाखरी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर असून, शेळ्या व बोकडांवरील हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला होता. त्यानंतर शनिवारी रात्री पुन्हा दोन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. यात एक शेळी ठार तर एक जखमी झाली. मागील आठ दिवसांत बिबट्याने पाच वेळा हल्ला केला असून, त्यात ४ शेळ्या ठार तर दोन जखमी झाल्या.

वाखरी येथील तानाजी काळे यांच्या शेळ्यांवर १६ जून, २० जुलै तसेच २, ४ व ५ ऑगस्ट रोजी हल्ले झाले. विशेष म्हणजे २, ४ आणि ५ ऑगस्ट असे सलग तीन दिवस हल्ले झाले. त्यानंतर वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले. या कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला. बिबट्याचा वावर कॅमेऱ्यात स्पष्ट झाल्यानंतरही वन विभागाने पिंजरा लावण्याची खबरदारी घेतली नाही. त्यामुळे हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. दि. ८ ऑगस्टच्या रात्री रावसाहेब गायकवाड यांच्या शेळ्यांवर हल्ला झाला. यात एक शेळी जखमी झाली. याच दिवशी संतोष व्यवहारे यांची शेळी हल्ल्यात ठार झाली. वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल चाटे, वनपाल बी. एस. भोई, वनरक्षक राजाभाऊ जाधवर, कल्पना पंधारे, संदीप किसवे, वनसेवक शकील मणेरी यांचे पेट्रोलिंग पथक गस्त घालत आहे.

^तानाजी काळेल यांच्या शेळ्यांवर २, ४ व ५ ऑगस्ट असे सलग तीन दिवस हल्ले झाले. त्यावेळी पिंजरा असता तर बिबट्या पिंजऱ्यात बंद झाला असता. वनविभागाच्या कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला आहे. त्यामुळे तत्काळ पिंजरा बसवावा. -संग्राम गायकवाड, ग्रामस्थ

^नागरिकांनी ऊस, झुडपे, दाट गवत व विहिरीच्या ठिकाणी विशेष काळजी घ्यावी. पाळीव जनावरे सुरक्षित गोठ्यात बांधावीत. संध्याकाळी व पहाटे लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये. रात्री टॉर्चचा वापर करावा. बिबट्या दिसल्यास तातडीने वनविभागाला माहिती द्यावी. शीतल चाटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पंढरपूर

वनविभागाने आणखी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे कॅमेरे मिळावेत यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी केली आहे. कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला आहे. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची आवश्यकता असताना पुन्हा कॅमेऱ्याचीच मागणी केली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत