Headlines

रोशनचा पुरावा मिटवण्याचा प्रयत्न, पोलिसांना तीन कामगारांची मदत, लोकलमधील ‘त्या’ व्हिडीओमुळे महत्त्वाचा उलगडा| Maharashtra Times


Roshan Suvarna: अंधेरी ते बोरिवली रेल्वे स्थानकांदरम्यान झालेल्या घटनेनंतर आरोपी रोशन सुवर्णाने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतरही शस्त्र कुठे आहे हे सांगण्यास त्याने नकार दिला. पण लोकलमधील व्हायरल व्हिडिओमुळे पोलिसांना पुरावा मिळाला आहे.

रोशन सुवर्ण
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: चर्चगेट-नालासोपारा लोकलमध्ये प्रवासी मयंक लोहारची चाकूने हत्या केल्याप्रकरणी तपास करणाऱ्या रेल्वे पोलिसांच्या हाती घटनेतील चाकू लागला आहे. विशेष म्हणजे, आरोपी रोशन सुवर्णाचा रक्ताने माखलेल्या चाकूसह असलेला व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यामुळेच हा महत्त्वाचा पुरावा पोलिसांपर्यंत पोहोचला. आरोपीची पोलिस कोठडी संपत असून त्याला आज, मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

कामगारांना चाकू रस्त्यावर सापडला

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हत्या केल्यानंतर आरोपी रोशन बोरिवली स्थानकाबाहेर पडला. स्थानकाच्या पश्चिमेकडील पोलिस ठाण्याजवळील एका गल्लीत त्याने हत्येसाठी वापरलेला चाकू रस्त्यावर फेकून दिला आणि तेथून पसार झाला. त्या दिवशी मुसळधार पाऊस झाल्याने चाकूवरील रक्ताचे डाग काही प्रमाणात धुऊन गेले होते. दरम्यान, बोरिवली पूर्व परिसरातून खरेदी करून परतणाऱ्या हॉटेलमधील तीन कामगारांना हा चाकू रस्त्यावर पडलेला दिसला. त्यांनी तो उचलला आणि घरी नेला.

Maharashtra TimesMayank Lohar Death Case : मुंबई मयंक लोहार मृत्यू प्रकरण; आरोपी रोशन सुर्वणाला धारधार शस्त्र कुणी दिलं? प्रकरणात डिलिव्हरी बॉय मित्राची एन्ट्री

धावत्या लोकलमध्ये २३ जूनला झालेल्या हत्येचा व्हिडीओ विविध समाज माध्यमात व्हायरल होत आहे. यात आरोपी रोशनने खुनासाठी वापरलेला चाकू स्पष्ट दिसत आहे. व्हिडीओतील चाकू आणि आपल्याकडे असलेला चाकू एकच असल्याचा संशय कामगारांना आला. कामगारांनी तत्काळ ही माहिती हॉटेल व्यवस्थापकाला दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत व्यवस्थापकाने संबंधित चाकू कामगारांकडून ताब्यात घेत रेल्वे पोलिस ठाण्यात जमा केला. त्यानंतर पोलिसांनी तो ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी जप्त केला आहे.

रोशनचा स्वभाव आधीपासूनच रागीट

रोशन पहिल्यापासूनच रागीट स्वभावाचा होता. छोट्या-छोट्या गोष्टींवरून वॉचमन आणि रिक्षा चालकांशी त्याचं अनेकदा भांडण झालं आहे. मयंकच्या हत्येसाठी वापरलेला चाकू रोशनने नुकताच खरेदी केला होता हे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले होते. पनवेलवरून मंगळुर येथे पळून जाण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी रोशनला अटक केली. त्यानंतर त्याला बोरिवली दंडाधिकारी न्यायालयात हजर केलं. टाकून दिलेला चाकू परत मिळवण्यासाठी वेळ हवा असल्यामुळे त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्याची मागणी करण्यात आली होती. पण, रोशनला केवळ पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.

Maharashtra TimesMumbai Local Mayank Lohar : मयंक लोहार मृत्यू प्रकरण; मुंबई पोलिसांचा आरोपीबाबत मोठा दावा, रेल्वे प्रशासनाकडून मोठी अपडेट, वाचा घटनाक्रम

रोशन सुवर्ण आपले आई-वडील आणि त्याच्या भावासोबत मिरा रोड येथील साईबाबा नगरमध्ये मेघदूत टॉवरमध्ये भाड्याचा घरात राहत होते. बारवीनंतर त्याने शिक्षण सोडलं होतं. गेल्या पाच वर्षांपासून तो अंधेरीमध्ये आपल्या वडीलांसोबत बारकोड तयार करणाऱ्या कंपनीमध्ये काम करत होता. रोशन सुवर्णाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली पण चाकू कुठे लपवला होता हे सांगण्यास नकार दिला होता. त्यामुळे चाकू सापडेल की नाही याबद्दल शंका निर्माण झाली होती. पण त्या व्हिडीओच्या सहाय्याने चाकू मिळवण्यात यश मिळालं आहे. हा चाकू रोशनने आपल्या ५० रुपयांत आपल्या मित्राकडून खरेदी केला होता.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा