पाकिस्तानमधील दुर्घटना : एसी कॉम्प्रेसरच्या स्फोटामुळे आगीचा भडका
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील एका रुग्णालयात बुधवारी लागलेल्या आगीत 15 नवजात बालकांचा मृत्यू झाला. ही घटना पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथील स्त्राrरोग विभागाच्या कक्षात घडली. अपघाताच्या वेळी या कक्षात 16 नवजात बालके उपचार घेत होती. यापैकी फक्त एका बाळाला वाचवता आले. उर्वरित 15 बालके दगावल्याचे बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या दुर्घटनेनंतर रुग्णालयाच्या अग्निसुरक्षा आणि नवजात बालकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सरकारी रुग्णालय कक्षातील एअर कंडिशनर कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्यामुळे आग लागली आणि ती वेगाने संपूर्ण वॉर्डमध्ये पसरली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत बहुतांश बालके गतप्राण झाली होती. जिल्हा प्रशासनाने या घटनेच्या तपासासाठी अतिरिक्त उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आग कशी लागली आणि अपघाताचे कारण काय होते, हे ही समिती निश्चित करेल. तपासानंतरच आगीचे नेमके कारण आणि अपघातास कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचे निर्धारण केले जाईल.
इस्लामाबादमधील सर्वात मोठे रुग्णालय
पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीआयएमएस) हे इस्लामाबादमधील सर्वात मोठे रुग्णालय आहे. सुमारे 140 एकर परिसरात पसरलेल्या या रुग्णालयात अंदाजे 1,300 खाटा असून, येथे 27 हून अधिक विविध आजारांवर उपचार केले जातात. ‘पीआयएमएस’मध्ये रुग्णालय, बाल रुग्णालय, माता व बाल आरोग्य केंद्र, बर्न केअर सेंटर आणि कार्डियाक सेंटर यांसारख्या अनेक प्रमुख वैद्यकीय केंद्रांचा समावेश आहे. बाल रुग्णालयात नवजात बालकांची काळजी आणि एनआयसीयू हा स्वतंत्र कक्षही उपलब्ध आहे. माता व बाल आरोग्य केंद्रामध्ये गर्भवती महिला आणि नवजात बालकांसाठी स्वतंत्र सुविधा आहेत
