Headlines

राष्ट्र प्रथम ट्रेंडिंगमध्ये!;’जेन झी’मध्ये मतमतांतरे, नाशिकमध्ये फलकबाजी चर्चेत


_राष्ट्र प्रथम
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,नाशिक :‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात दिल्लीत झालेल्या ‘जेन-झी’च्या आंदोलनातील आक्षेपार्ह घोषणा आणि वक्तव्यांचा सोशल मीडियावर पेटलेला वाद आता नाशिक शहरातील रस्त्यांवरील फलकांमधून दूर करण्याचा प्रयत्न होत आहे.

आता ‘होर्डिंग वॉर’ सुरू

‘राष्ट्र प्रथम’ असे फलक शहरात ‘जेन-झी’च्या नावाने लावण्यात आले असून, तरुण वर्ग, राष्ट्रीय संस्था, केंद्र सरकार, पोलिसांसह इतर यंत्रणांना बदनाम करणाऱ्यांविरुद्ध आता ‘होर्डिंग वॉर’ सुरू झाले आहे. संपूर्ण शहरात व सोशल मीडियावर ‘वुई सपोर्ट नेशन’चा ट्रेंड सुरू असून त्यातून ‘जेन-झी’मधील होत असलेले मतमतांतर शहरासह राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

होर्डिंग मोहिमे’चा मार्ग निवडला

‘जेन-झी’मार्फत झालेल्या आंदोलनात विविध यंत्रणांसह धार्मिक मुद्द्यांवर अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप काही घटकांकडून झाला होता. त्यामुळे ‘जेन-झी’ची प्रतिमा मलिन केली जात असल्याची तीव्र भावना नाशिककर तरुणांमध्ये उमटली आहे. आंदोलनातील आक्षेपार्ह मुद्दे आणि त्याच्या समर्थनाच्या नावाखाली चाललेल्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा गदारोळ न करता नाशिकच्या सुजाण तरुणांनी ‘होर्डिंग मोहिमे’चा मार्ग निवडला आहे. त्यामागे इतरही ‘इच्छाशक्तीं’चा पाठिंबा असल्याची चर्चा असून, ही फलकांची नारेबाजी लवकरच राज्यभरात सुरू होणार असल्याचे कळते.

संस्कृतीची गौरवशाली परंपरा जपली पाहिजे

दरम्यान, ‘आम्ही विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या मागण्यांच्या पाठीशी पूर्णपणे आहोत. परंतु आंदोलनाच्या नावाखाली पोलिस, पंतप्रधान, देश किंवा संस्कृतीविरोधात दिल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह घोषणांचे समर्थन करणार नाही’, या आशयानुसार शहरात फलकबाजी सुरू आहे. नाशिकच्या ओळखीचा (देवभूमी), नाशिकच्या संस्कृतीचा उल्लेख करीत, विद्यार्थ्यांनी मागण्या मांडताना देशाची आणि संस्कृतीची गौरवशाली परंपरा जपली पाहिजे, असा संदेशही देण्यात आला आहे.

‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार अन् दुसरीकडे नाशिकच्या रस्त्यावर गर्जनारे ‘नाशिक पोलिस झिंदाबाद!’चे नारे… दिल्ली आणि महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यपद्धतीतील हाच मोठा फरक सध्या सोशल मीडियावर ‘जेन-झी’कडून या आशयाचा व्हिडीओ जोरदार ‘हायलाइट’ केला जात आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा