Headlines

रामदास आठवलेंचे एकनाथ शिंदेंकडून तोंडभरून कौतुक:म्हणाले- आठवले नीडर म्हणूनच मास लीडर




केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्ती सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठवले यांच्या दहा वर्षांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “सामाजिक न्यायाची मशाल, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बाबासाहेबांच्या विचारांचे सच्चे अनुयायी आणि नीडर मास लीडर” अशी गौरवपूर्ण उपाधी दिली. राज्यातील १३ कोटी जनतेच्या वतीने तसेच शिवसेना परिवाराच्या वतीने त्यांनी आठवले यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची १२ वर्षांची वाटचाल आणि रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रिपदाची १० वर्षे हा सामाजिक न्यायासाठी अभिमानाचा टप्पा आहे. या दशकभरात आठवले यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी सातत्याने काम केले असून मागासवर्गीय विद्यार्थी, दिव्यांग, वृद्ध आणि वंचित घटकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले. यावेळी शिंदे यांनी ठाण्यात राबविण्यात आलेल्या २,२०० लहान मुलांच्या कॉक्लिअर इम्प्लांट उपक्रमाचाही उल्लेख करत समाजसेवा हीच खरी लोकसेवा असल्याचे सांगितले. अशा संवेदनशील उपक्रमांमुळे हजारो कुटुंबांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. रामदास आठवले हे दलित पँथर चळवळीतील संघर्षशील नेतृत्व असून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आयुष्यभर जिवापाड जपले, असे सांगताना शिंदे म्हणाले की संघर्ष असो, संसदेतील प्रभावी मांडणी असो किंवा संविधानाच्या रक्षणाचा प्रश्न असो, आठवले नेहमी खंबीरपणे अग्रभागी उभे राहिले. दीक्षाभूमी, चैत्यभूमी आणि इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळ दिले. दलितांविषयीचे प्रेम त्यांच्या उरात आहे म्हणूनच त्यांचे चाहते संपूर्ण देशभर आहेत. ते नीडर आहेत म्हणूनच ते मास लीडर आहेत,” असे म्हणत शिंदे यांनी आठवले यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात आणि त्यांची कार्यपद्धती लोकाभिमुख असल्यामुळे दिल्लीतही त्यांचा वेगळा रुबाब आहे, असे त्यांनी सांगितले. रामदास आठवले यांच्या हजरजबाबी शैलीचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “संसदेत कितीही तणावाचे वातावरण असले तरी आठवले साहेब उभे राहिले की संपूर्ण सभागृहाचे वातावरण बदलते. त्यांच्या चारोळ्या आणि विनोदी शैलीमुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुलते.” यावेळी त्यांनी मिश्कील शब्दांत “तुमच्या मंत्रिपदाला झाली दहा वर्षे, तुमची प्रगती पाहून आम्हाला होतो हर्ष” अशी चारोळीही सादर केली. राजकीय दूरदृष्टीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, “अब की बार मोदी सरकार” हा जनादेश रामदास आठवले यांनी सर्वप्रथम ओळखला. त्यांनी विश्वास, मेहनत आणि मैत्रीचे राजकारण कायम जपले. कुठल्याही आघाडीत असले तरी त्यांनी नातेसंबंध टिकवले आणि म्हणूनच ते सच्चे मित्र आहेत, असे सांगत शिंदे यांनी सभागृहात “हम नहीं छोड़ेंगे दोस्ती… रामदास भाई आगे बढ़ो, शिवसेना तुम्हारे साथ है,” अशी घोषणा दिली. शेवटी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत “आपको मिलती रहेगी मंत्रीपद की गद्दी, क्योंकि आपके साथ हैं नरेंद्र मोदी,” असे म्हणत आठवले यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “समतेचा दिवा अखंड तेवत राहो, अन्यायाचा अंधार दूर होवो आणि बाबासाहेबांच्या विचारांची मशाल रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली अधिक तेजस्वीपणे पुढे जात राहो,” अशा शब्दांत त्यांनी भाषणाचा समारोप केला. यावेळी रामदास आठवले यांच्या पत्नी सीमाताई आठवले, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते अविनाश महातेकर, सिद्धार्थ कासारे, शिवसेनेचे सह – मुख्य प्रवक्ते राजू वाघमारे आणि रिपब्लिकन पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत