सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी : राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे २० ते २२ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांच्या क्षमता बांधणी प्रशिक्षणाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी एकत्रितपणे या प्रशिक्षणात सहभाग नोंदवत एक नवा आदर्श निर्माण केला.
प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी यशदाचे महासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी उपस्थित सदस्यांशी संवाद साधत प्रभावी लोकप्रतिनिधित्वासाठी सक्षम नेतृत्व, पारदर्शक प्रशासन आणि विकासाभिमुख नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच सत्र संचालिका रेश्मा होजगे उपस्थित होत्या.
या प्रशिक्षणात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, वित्त व बांधकाम समिती सभापती संतोष साटविलकर, शिक्षण व आरोग्य समिती सभापती प्रितेश राऊळ, महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नारकर, समाजकल्याण समिती सभापती रुहिता तांबे यांच्यासह सर्व सदस्यांनी जिल्हा परिषद सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
