![]()
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील दहेली गावाजवळून वाहणाऱ्या कुपटी नदीला आलेल्या पुरात कार वाहून गेल्याची एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. पुराच्या पाण्यातून जीवघेणे धाडस करत वाहन पुढे नेण्याचा निर्णय या कुटुंबाच्या जीवावर बेतला असून, या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या आईसह तिच्या दोन मुलींचे मृतदेह शोधण्यात अखेर बचाव पथकाला यश आले आहे. या घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, पोलिस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत रात्रीपासूनच युद्धपातळीवर शोध व बचाव मोहीम राबवली होती. एकाच कुटुंबातील तिघींचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परिसरात सध्या मोठी शोककळा पसरली आहे. झाडाचा आधार घेतल्याने अविनाश खंडारे थोडक्यात बचावले काल मध्यरात्रीच्या सुमारास लोणी येथील अविनाश खंडारे हे कुटुंबीयांसह ‘अर्टिगा’ कारने गावी परतत असताना त्यांची कार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या थरारक घटनेत अविनाश खंडारे यांनी एका झाडाचा आधार घेतल्याने आणि त्यांच्या हाका ऐकून बचाव पथकाने तातडीने धाव घेतल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. मात्र त्यांची शिक्षिका असलेली पत्नी माधवी आणि प्राची व साची या दोन्ही मुली पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. रात्रभर चाललेल्या तब्बल बारा तासांच्या शोधमोहिमेनंतर या तिघींचेही मृतदेह हाती लागले आहेत. दरम्यान, दारव्हा ते आर्णी या मार्गावरील सिमेंट रस्त्याचे पुलाजवळील काम अर्धवट अवस्थेत असणे, पुलावरील मोठे खड्डे आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही सूचना फलकांचा अभाव यामुळेच हा भीषण अपघात झाल्याचा गंभीर आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे. “माझी सर्व प्रॉपर्टी घ्या, पण किमान पुलावर दिशादर्शक लावा,” या भीषण अपघातातून सुदैवाने बचावलेले अविनाश खंडारे यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्यासमोर आपला टाहो फोडत, “माझी सर्व प्रॉपर्टी घ्या, पण किमान पुलावर दिशादर्शक फलक तरी लावा,” अशी आर्त विनंती केली. यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री राठोड यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत, रस्त्याचे अर्धवट बांधकाम आणि पुलावरील खड्ड्यांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याची चूक मान्य केली. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले जातील, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिले आहे. जीवघेणा धोका पत्करू नये- प्रशासन या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या माधवी खंडारे या लोणी येथील आश्रम शाळेत मानधन तत्त्वावर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. एकाच कुटुंबातील तिघींचा असा दुर्दैवी अंत झाल्याने लोणी गावासह संपूर्ण दारव्हा तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे. या वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, पुराचे पाणी असलेल्या पुलांवरून किंवा रस्त्यांवरून वाहन नेण्याचा जीवघेणा धोका पत्करू नये, असे आवाहन केले आहे. पाण्याचा प्रवाह ओसरेपर्यंत नागरिकांनी सुरक्षित ठिकाणीच थांबावे आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Source link
यवतमाळमध्ये हृदयद्रावक घटना:पुरात कार वाहून गेल्याने आईसह दोन मुलींचा करुण अंत, झाडाचा आधार घेतल्याने पती बचावले
