![]()
शासकीय कामांची बिले वेळेत न मिळाल्याने निर्माण झालेल्या तीव्र आर्थिक संकटातून आणि मानसिक त्रासातून मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकाते यांनी आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या गजानन देवकाते यांनी मुंबई महापालिकेची सुमारे 2 कोटी रुपयांची कामे केली होती. कामे पूर्ण होऊनही बिले मिळवण्यासाठी त्यांना प्रशासकीय कार्यालयांचे खेटे मारावे लागत होते. अखेर सततच्या मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गजानन देवकाते यांनी सुमारे वर्षभरापूर्वीच मुंबई महापालिकेच्या संबंधित कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून आपल्या अडचणी मांडल्या होत्या. माझे कुटुंब आणि त्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे याच व्यवसायावर अवलंबून आहे. कामे पूर्ण करूनही बिले मिळवण्यासाठी पालिकेच्या 10-10 वेळा चकरा माराव्या लागत आहेत. काम करूनही पैसे मिळत नसतील, तर आम्ही जगायचे कसे? असा आर्त सवाल त्यांनी या पत्रातून उपस्थित केला होता. मात्र, प्रशासनाने त्यांच्या या पत्राची वेळेत दखल न घेतल्याने अखेर त्यांनी हे पाऊल उचलले. सांगलीपाठोपाठ राज्यातील दुसरी घटना सरकारी कामांची बिले रखडल्यामुळे कंत्राटदाराने आत्महत्या करण्याची राज्यातील ही अवघ्या काही दिवसांतील दुसरी घटना आहे. यापूर्वी जलजीवन मिशनअंतर्गत काम करणाऱ्या हर्षल पाटील या कंत्राटदाराने 1 कोटी 40 लाख रुपयांची थकबाकी न मिळाल्याने नैराश्यातून आत्महत्या केली होती. आता मुंबईत घडलेल्या या घटनेने कंत्राटदारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. 86 हजार कोटींच्या थकबाकीवरून कंत्राटदार आक्रमक एकीकडे राज्यात कंत्राटदारांच्या आत्महत्येचे सत्र सुरू असताना, दुसरीकडे मुंबईतील आझाद मैदानावर कंत्राटदारांनी थकीत बिलांच्या मुद्द्यावर तीव्र आंदोलन पुकारले आहे. राज्यभरातील कंत्राटदारांची तब्बल 86 हजार कोटी रुपयांची बिले शासनाकडे प्रलंबित असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या थकीत बिलांच्या संदर्भात कंत्राटदारांच्या प्रतिनिधींनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या होत्या. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- रोहित पवार कंत्राटदाराच्या आत्महत्येवर बोलताना रोहित पवार म्हणाले की, वर्षानुवर्षे थकीत असलेली कोट्यवधी रुपयांची बिलं मिळत नसल्याने राज्यातील मराठी कंत्राटदारांवर या सरकारने आत्महत्येची वेळ आणलीय. आतापर्यंत 6 कंत्राटदारांनी आत्महत्या केल्या असून आज नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकाते यांनीही आपलं आयुष्य संपवलं. रोहित पवार म्हणाले की, गुजरात आणि प्रदेशातील ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची बिलं तातडीने अदा केली जातात मग मराठी कंत्राटदारांनी सरकारचं काय घोडं मारलंय? कितीही आंदोलनं केली, संविधानिक मार्गाने मागणी केली तरी सरकार कंत्राटदारांची बिलं देत नाही. त्यामुळं आत्महत्या करण्यास भाग पाडलं म्हणून या सरकारवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करु नये? रोहित पवार म्हणाले की, माझी सर्व मराठी कंत्राटदारांना विनंती आहे की, आत्महत्या हा आपला मार्ग नाही. आपल्याला आपल्या हक्कांसाठी, कुटुंबासाठी आणि अस्तित्त्वासाठी एकत्रित येऊन मोठा लढा उभारावा लागेल. संघर्षाच्या मार्गाने या सरकारला आपण वठणीवर आणू, पण कृपया कुणीही आत्महत्या करु नये. गजानन देवकाते यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत..
Source link
मुंबईत कंत्राटदाराची आत्महत्या:वर्षभरापूर्वी पत्रातून मांडली होती व्यथा, गुजरातच्या ठेकेदारांना लगेच पैसे मिळतात- रोहित पवार
