झांसी : उत्तर प्रदेशातील झांसी-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण रस्ते अपघातात माफिया नेता व माजी खासदार अतीक अहमद यांचा धाकटा मुलगा अबान अहमद याचा मृत्यू झाला. या अपघातात त्याच्यासोबत असलेल्या आणखी एका तरुणाचाही मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अबान अहमद हा झांसी कारागृहात कैद असलेल्या त्याचा मोठा भाऊ अली अहमद याला भेटण्यासाठी मित्रांसह कारने झांसीला आला होता. भेट आटोपून परतत असताना पूंछ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झांसी-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहनाचा भीषण अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा चक्काचूर झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना मोठ येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर अबान अहमद याला मृत घोषित केले. त्याच्यासोबत असलेल्या आणखी एका तरुणाचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी झांसी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहोचले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. प्राथमिक तपासात अतिवेग आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर रुग्णालय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
