Headlines

मांडवी एक्सप्रसेमध्ये तांत्रिक बिघाड, कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; कोकणकन्या ८ तास विलंबाने| Maharashtra Times


Konkankanya Express: कोकण रेल्वेचं मान्सूनचं वेळापत्रक लागू केल्यापासून गाड्यांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे यापूर्वीच सर्व ट्रेन विलंबाने धावत असून एका गाडीच्या तांत्रिक बिघाडामुळे अनेक गाड्यांचं वेळापत्रक कोलमडू लागलं आहे.

कोकण रेल्वे
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. वृत्तसेवा, चिपळूण: कोकण रेल्वेमार्गावरील अनेक गाड्यांचे वेळापत्रक शनिवारी कोलमडले. याचा परिणाम छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसवरही झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्थानकात ही गाडी तब्बल आठ तास उशिराने दाखल झाली. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

मांडवीमुळे संपूर्ण कोकण रेल्वेवर परिणाम

शनिवारी कोकणकन्या एक्स्प्रेस खेड स्थानकात पहाटे ३.०४ या नियोजित वेळेऐवजी सकाळी ११.१० वाजता दाखल झाली. या विलंबाला शुक्रवारी मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसमध्ये झालेला तांत्रिक बिघाड कारणीभूत ठरल्याची प्रत्येक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी ७.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटलेल्या मांडवी एक्स्प्रेसच्या थर्ड इकॉनॉमी एसी डब्यांतील वातानुकूलन यंत्रणा खेड स्थानकापासूनच बंद पडली.

Maharashtra TimesPune-Nashik Railway Project : कर्जही मिळेना अन् विकताही येईना; प्रकल्प रद्द पण सातबाऱ्यावर शिक्के कायम, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गामुळे शेतकरी हवालदिल

त्यामुळे डब्यातील प्रवाशांची अक्षरशः घुसमट झाली. उकाड्यामुळे अनेक प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर मांडवी एक्स्प्रेस रत्नागिरी रेल्वे स्थानकात थांबवून तिचे इंजिन बदलण्यात आले. सुमारे २५ मिनिटांच्या थांब्यानंतर वातानुकूलन यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र या तांत्रिक बिघाडामुळे मांडवी एक्सप्रेस उशिराने धावली आणि त्याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावरील इतर गाड्यांवरही झाला. परिणामी, कोकणकन्या एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. कोकण रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.

क्रॉसिंगमुळे आणखी विलंब

मांडवी एक्सप्रेसच्या विलंबामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून रात्री ११ वाजता सुटणारी कोकणकन्या शुक्रवारी उशीरा रवाना झाली. या गाडीला सुटण्यासाठी मध्यरात्रीचे सुमारे ३ वाजले. त्यानंतरही अनेक ठिकाणी क्रॉसिंगसाठी कोकणकन्या थांबवण्यात आली. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. पण हे सर्व बिघाड दूरस्थ करून सर्व गाड्या सुरळीत धावत असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

मान्सूनचं वेळापत्रक लागू

१५ जूनपासून कोकण रेल्वेवर मान्सूनचं वेळापत्रक लागू करण्यात आलं आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या डोंगराळ भागातून जात असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ट्रेनवर वेगमर्यादा लावण्यात आली आहे. यामुळे ट्रेन नेहमीपेक्षा उशीराने धावत असून अशा तांत्रिक बिघाडांमुळे संपूर्ण वेळापत्रक कोलमडतं.

Maharashtra TimesVersova-Bhayander Coastal Road: नव्या कोस्टल रोडसाठी झाडांची पुनर्लागवड पूर्ण झाल्याचा दावा, पण वास्तव वेगळंच; ४५ हजार खारफुटींचं काय?

कोकण रेल्वे मार्गावर अनेक बोगदे, पूर आणि तीव्र वळणं आहेत. मुसळधार पाऊस झाला तर दरडी कोसळतात, दृश्यमानता कमी होते. यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी वेगमर्यादा ताशी १२० किमी वरून थेट ताशी ७५ ते ९० किमी करण्यात आली आहे. त्यात मान्सूनपूर्व कामंसुद्धा कोकण रेल्वेवर सुरु आहेत. त्यामुळे देखभालींच्या कामासाठी प्री-एनआय ब्लॉक घेतले जातात. यामुळे गाड्यांना ३ ते ५ तास विलंब होतो. तसेच, कोकण रेल्वेवर सिंगल लाइन ट्रॅक असल्यामुळे एका गाडीला झालेल्या विलंबाचा परिणाम पुढील गाड्यांवरही होतो.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा