Headlines

महाराष्ट्रावर पाऊस रुसला! श्रावण उजाडतोय तरी पुढच्या पाच दिवसांचा अंदाज अनपेक्षित


महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. पण पाऊस येण्याच्या तयारीत दिसत नाही. आतादेखील हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार, पुढच्या पाच दिवसात अपेक्षित पावसाची शक्यता फार कमी आहे.

Maharashtra Rain
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : राज्यात जवळपास आठ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे सर्वाधिक पाऊस पडलेल्या भागांना दिलासा मिळाला असला तरी राज्यातील बहुसंख्य भाग पावसाने अद्यापही वंचित आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट बघायला मिळत आहे. त्यामुळे नागरिक पावसाची वाट बघत आहेत. राज्यात पाऊस कधी परतणार किंवा पुढच्या पाच दिवसांत पावसाचा अंदाज काय असेल? याबाबत पुणे हवामान विभागाचे तज्ज्ञ एस डी सानप यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

“पुणे जिल्ह्यात घाट माथ्यावर आणि विविध भागांमध्ये खूपच हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. 5 मिमी पेक्षाही कमी पावसाची नोंद विविध ठिकाणी होत आहे. घाट माथ्यावर हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पावसाची नोंद गेल्या 24 तासात झालेली आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. किंवा काही ठिकाणी उघडीप देखील दिसून येईल”, अशी माहिती एस डी सानप यांनी दिली.

पुढच्या पाच दिवसांत पावसाची काय अवस्था राहणार?

“पुढच्या पाच दिवसांमध्ये सर्वदूर पावसाची शक्यता नाही किंवा मुसळधार पावसाची शक्यता नाही. पावसाचे प्रमाण मध्यम स्वरुपाचे असेल किंवा तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. त्यामुळे तूट भरुन निघण्याची शक्यता कमी आहे. पण हलक्या स्वरुपाचा पाऊस तूरळक ठिकाणी पडू शकतो. आता कोणतीही सिस्टीम म्हणजेच कमी दाबाचे क्षेत्र किंवा मान्सूनचे वारे सक्रीय आहेत, अशी परिस्थिती नाही”, असं हवामान तज्ज्ञ सानप यांनी सांगितलं.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, पण…

“कमी दाबाचे क्षेत्र आहे, पण ते बंगालच्या उपसागराच्या उत्तरेच्या दिशेला निर्माण झालेलं आहे. त्याचा परिणाम हा उडिसा, पश्चिम बंगाल, झारखंड या भागांमध्ये होत आहे. आपल्याकडे पुढच्या चार ते पाच दिवसांत तरी त्याचा परिणाम होणार नाही. अजून काही हवामान बदल झाले तर कळवले जाईल”, अशी माहिती त्यांनी दिली.

पावसाची राज्यात कुठे-कुठे तूट?

पावसाचीसर्वाधिक तूट ही सोलापूर जिल्ह्यात आहे. तिथे सरासरीपेक्षा 33 टक्के कमी पाऊस पडला आहे. तसेच इतर जिल्ह्यांमध्येदेखील कमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये जालना, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर यांचा समावेश आहे. मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाची तूट आहे.

दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील सिंधुदुर्गात 20 टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची तूट आहे. जास्त पाऊस हा उत्तर कोकण आणि घाट माथ्यावर झाला आहे. तर अनेक ठिकाणी पावसाची तूट आहे, असं एकंदरीत चित्र आहे, अशी देखील माहिती हवामान तज्ज्ञ सानप यांनी दिली.

दोन महिन्यांमध्ये कसा पाऊस पडेल?

येणाऱ्या दोन महिन्यांचा विचार केला तर पाऊस हा सरासरी इतका राहणार असल्याची शक्यता आहे. किंवा काही ठिकाणी तो सरासरी पेक्षा कमी देखील असू शकतो. पण मला असं वाटतं की जो पुढच्या पाच ते सात दिवसांच्या अंदाजावर जास्त अवलंबून असणं गरजेचं आहे. कारण हवामानात बदल होत असतात. जुलैत एकीकडे खूप जास्त पाऊस पडला तर काही भागांमध्ये पावसाची तूट बघायला मिळाली. येणाऱ्या चार-पाच दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता नाही, अशी प्रतिक्रिया हवामान तज्ज्ञ एस डी सानप यांनी दिली.